गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर आणि नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून भारतीय छावण्यांवर करण्यात येणारा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा अजूनही सुरूच असताना आता पाकिस्तानी सैन्यही तेथील सीमारेषेवर पोहोचले असल्याची माहिती मिळालीये. पाकिस्तानच्या सीमारेषेचे रक्षण करणाऱया पाकिस्तानी रेंजर्सच्या मदतीला तेथील लष्कराने धाव घेतल्याचे समजल्यानंतर भारतानेही तातडीने सीमा सुरक्षा दलाच्या देशातील जवानांना काश्मीरमध्ये पाठविण्याचे नियोजन केले आहे.
जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि काश्मीरमधील नियंत्रणरेषेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या सातत्याने सुरूच आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानकडून सातत्याने उखळी तोफांचा मारा करण्यात येतो आहे. मंगळवारीच पाकने केलेल्या हल्ल्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार कऱण्यात येत असल्यामुळे शिंदे यांना प्रत्यक्ष सीमारेषेवर जाता आले नव्हते.
गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या दलातील नऊ जवान जखमी झाले असून, एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानी रेंजर्सला आता तेथील लष्कराने मदत करण्यास सुरुवात केलीये. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतही चोख प्रत्युत्तर देत असल्याचे सीमा सुरक्षा दलाचे जम्मूतील महासंचालक धरमिंदर परीक यांनी सांगितले.
छत्तीसगढमध्ये निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या ४०० जवानांना पुन्हा जम्मूमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आर. एस पुरा सेक्टर भागातील छावणीवर एका दिवसात ४०० उखळी तोफांचा मारा करण्यात आल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.