News Flash

१३ महिन्यांच्या तुरुंगावासादरम्यान त्या कैद्याने बनवलं सॉफ्टवेअर; सर्वोच्च न्यायालयानेही केलं कौतुक

तुरुंग प्रशासनाला मदत करणारं हे सॉफ्टवेअर सध्या १०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये वापरलं जातंय

(मूळ फोटो रॉयटर्स)

इंजीनियर्स जिथे जातात तिथे आपली चमक दाखवतात असं इंजीनियर्सबद्दल म्हटलं जातं. आपल्या क्षेत्रासंदर्भातील आवड, कामाबद्दलचं प्रेम आणि इतर गोष्टी इंजीनियर्सला अडचणीच्या काळातही प्रेरणा देत असतात असं म्हणतात. असंच काहीसं चित्र सॉफ्टवेअर इंजीनियर असणाऱ्या अमित मिश्रासंदर्भातील प्रकरणामध्ये दिसून आलं. १३ महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अमितने या कालावधीमध्ये एक सॉफ्टवेअर तयार केलं आहे. विशेष म्हणजे तुरुंगात राहून तयार केलेलं हे सॉफ्टवेअर तुरुंगाचे व्यवस्थापन सुधारण्यासंदर्भातील आहे. अमितने तयार केलेलं सॉफ्टवेअर पाहून सर्वोच्च न्यायालय आणि इतर वकींलांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनीही या कामासाठी अमितचं कौतुक केलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार काही वर्षांपूर्वी अमितच्या पत्नीने आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये अमितला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला १३ महिन्यांसाठी हरयाणामधील ग्रुरुग्राममधील तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. याच कालावधीत त्याने हे सॉफ्टवेअर तयार केलं. एक वर्ष तुरुंगामध्ये राहिल्यानंतर अमितची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र तुरुंगात राहून अमितने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमुळे आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयानेही अमितचं कौतुक केलं. न्या. संजय किशन कौल आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सर्व राज्यांनी अमितने बनवलेलं सॉफ्टवेअर पहावं असा सल्ला दिला आहे. तुरुंगांमधील सुधारणांसाठी हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरु शकते. त्यामुळेच केवळ हरयाणाचा नाही तर देशातील इतर राज्यांनाही या सॉफ्टवेअरचा वापर शक्य आहे का यासंदर्भातील विचार करावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

सामान्यपणे कोणालाही आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मरेपर्यंत ती व्यक्ती तुरुंगामध्येच असते. मात्र राज्य सरकार आणि तुरुंग प्रशासनाला अशा व्यक्तींना १४ वर्षांनंतर सोडून देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तुरुंगामधील वागणुकीच्या आधारे यासंदर्भातील निर्णय घेतला जातो. अमितने बनवलेल्या सॉफ्टवेअरमुळे कोणत्याही कैद्यासंदर्भातील रियल टाइम एन्ट्री करता येते. म्हणजेच हा कैदी तुरुंगामध्ये कसा राहतो, काय करतो, इतरांशी कसा वागतो या सर्व गोष्टींची सॉफ्टवेअरच्या मदतीने नोंद ठेवता येणार आहे. या सॉफ्टवेअरला फिनिक्स असं नाव देण्यात आलं आहे.

सध्या हे सॉफ्टवेअर हरयाणामधील १९ जिल्ह्यांमध्ये वापरलं जात आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील ३८, उत्तर प्रदेशमधील ३१ आणि हिमाचल प्रदेशमधील १३ जिल्ह्यांमध्ये या सॉफ्टवेअरची मदत तुरुंग प्रशासनाकडून घेतील जात असल्याचे अमितने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 8:55 am

Web Title: gurugram techie jailed for 13 months develops software to make prisons high tech scsg 91
Next Stories
1 धक्कादायक! मुलीची छेड काढणाऱ्यांची तक्रार केली म्हणून पित्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
2 “पती कितीही क्रूर असला तरी त्या शरीरसंबंधांना…”; वैवाहिक बलात्कारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
3 सॅटेलाईट फोटोतून चीनचा डाव उघड; देप्सांगपासून २५ किमी अंतरावरील चौकीचा केला विस्तार
Just Now!
X