2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये इव्हीएमचा घोळ झाला होता. हा घोळ गोपीनाथ मुंडे यांना ठाऊक होता म्हणून त्यांची हत्या झाली असा दावा कारणारा हॅकर सय्यद शूजा याने आपण ECIL कंपनीत काम करत होतो असे म्हटले होते. मात्र या कंपनीने त्याचा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. ECIL कंपनीने या संदर्भात एक पत्रकच प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात कंपनीने आपल्या कंपनीत सय्यद शूजा नावाचा कोणताही कर्मचारी कार्यरत नसल्याचं म्हटलं आहे.

इसीआयएल या कंपनीचे अध्यक्ष अॅडमिरल संजय चौबे (निवृत्त) यांनी शूजा यांचा दावा फेटाळून लावला आहे. सय्यद शूजाने आपण 2009 ते 2014 या कालावधीत या कंपनीत काम करत होतो असे म्हटले होते. मात्र त्याचा हा दावा कंपनीने फेटाळला आहे. आमच्या कंपनीत सय्यद शूजा नावाचा कोणीही कर्मचारी नव्हता असे या कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आता सय्यद शूजा पत्रकार परिषदेत खोटे का बोलला हे याचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान ही पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजित होती असा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. तर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा राजकीय विषय नसून देशाच्या लोकशाहीसंदर्भातला विषय आहे असे सिब्बल यांनी म्हटलं आहे. सय्यद शूजाने जे आरोप केले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी सिब्बल यांनी केली.