भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री कार्डिअ‍ॅक  अरेस्टमुळे निधन झालं. त्या ६७ वर्षाच्या होत्या. सुषमा यांच्या अकाली निधनानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईतील हमीद अन्सारी या तरूणाने माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी अन्सारी भावूक झाला होता. सुषमा स्वराज यांच्याच प्रयत्नामुळे अन्सारीची पाकिस्तानमधून सुटका झाली होती. अन्सारीने ‘मातृछत्रच हरपले’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सहा वर्ष पाकिस्तानी तुरूंगात राहिलेला अन्सारी म्हणाला की, ‘सुषमा स्वराज यांच्याबद्दल प्रचंड आदर असून माझ्या हृदयात त्या नेहमी जिवंत राहतील. स्वराज माझ्या आईसारख्या होत्या. पाकिस्तानमधून परतल्यानंतर त्यांनी माझं मार्गदर्शन केलं होतं. स्वराज यांचं निधनाने माझं मोठं नुकसान झालं आहे. एकप्रकारे माझं मातृछत्रच हरपले आहे.’

पाकिस्तानच्या तुरुंगात सुमारे ६ वर्षे काढल्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये हमीद निहाल अन्सारी भारतात परतला आहे.  त्याला पाकिस्तानातील पेशावरमधील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. २५ डिसेंबर २०१५ मध्ये त्याला पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. कोर्टाने सुनावलेली शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली.

अन्सारीची फेसबुकवरील ऑनलाईन चॅटिंगदरम्यान एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तो आतूर झाला होता. त्यासाठी त्याने आपल्याला अफगाणिस्तानात काम मिळाल्याचे घरच्यांना सांगितले आणि तो तिला भेटण्यासाठी पहिल्यांदा अफगाणिस्तानला गेला त्यानंतर तिथून तो बनावट पासपोर्ट बनवून पाकिस्तानात पोहोचला होता. त्याचा हा अवैध प्रवास पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांच्या रडावर आला. त्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्याने हेरगिरीच्या आरोपखाली ताब्यात घेतले. पाकिस्तानच्या सैन्य कोर्टात त्याच्यावर खटला भरण्यात आला आणि त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.