घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जोधपूरच्या अनुसूचित जाती-जमाती कोर्टाने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


पंड्याच्या टिप्पणीविरोधात डी. आर. मेघवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मेघवाल यांच्या म्हणण्यानुसार, पंड्याने आंबेडकरांचा अपमान केला असून दलित समाजाच्या भावनाही दुखावल्या आहेत. त्याने २६ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर डॉ. आंबेडकर यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने म्हटले होते की, ‘कोण आंबेडकर? अशी व्यक्ती जिने देशाच्या संविधानाचा मसूदा तयार केला. की अशी व्यक्ती जीने देशाला आरक्षण नावाचा आजार दिला’.

मेघवाल हे राष्ट्रीय भीम सेना या संघटनेचे सदस्य आहेत. त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पंड्यासारख्या प्रसिद्ध क्रिकेटरने अशा प्रकारची टिप्पणी करुन केवळ संविधानाचाच नव्हे तर दलित समाजाचाही अपमान केला असून त्यांच्या भावनाही दुखावल्या आहेत.

जानेवारी महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यामातून मला हार्दिक पंड्याने केलेल्या टिप्पणीबाबत माहिती मिळाली होती. आंबेडकरांसारख्या आदर्श व्यक्तीबाबत अशा प्रकारे वादग्रस्त टिप्पणी त्याने केल्याचे मेघवाल यांनी म्हटले आहे.