कायदा आणि सुव्यवस्था बाधित होईल अशा प्रकारची कोणतीही कृती

करणार नाही, अशी हमी पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने शनिवारी न्यायालयात दिली आहे.तथापि, पटेल समाजाच्या आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरूच राहील, असेही हार्दिक पटेल याने स्पष्ट केले आहे.

हार्दिकने रफिक लोखंडवाला या वकिलांमार्फत सत्र न्यायमूर्ती एस. एच. ओझा यांच्या न्यायालयात हमीपत्र सादर केले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिकला सहा महिने गुजरातच्या बाहेर राहण्याची अट घातली असून त्यानुसार सहा महिने उदयपूर येथे वास्तव्य करणार असल्याचे हार्दिकने म्हटले आहे. कारागृहातून सुटका झाल्यानंतर दोन दिवसांच्या कालावधीत हार्दिकने हमीपत्र सादर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला. गुजरातबाहेर कोणत्या ठिकाणी वास्तव्य करणार आहे तेथील पत्ताही जाहीर करण्याचे आदेश हार्दिकला देण्यात आले आहेत.