माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अफजल गुरूबाबत केलेले वक्तव्य व माजी गृह सचिव जी. के. पिल्लई यांनी इशरत जहाँ मारली गेली त्या प्रकरणातील प्रतिज्ञापत्राबाबत केलेले विधान यांचे पडसाद लोकसभेत उमटले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना इशरत जहाँ मारली गेली ती चकमक बनावट असल्याचे दाखवून तत्कालीन यूपीए सरकारने त्यांच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपने केला.

राष्ट्रपतींच्या भाषणावर धन्यवाद प्रस्तावापूर्वी सभागृहात चर्चा सुरू झाली तेव्हा अनुराग ठाकूर यांनी सांगितले, की अफजल गुरूच्या प्रकरणात योग्य न्याय झाला नाही, असे वक्तव्य चिदंबरम यांनी केले होते. माजी गृहसचिव पिल्लई यांनी असे म्हटले होते, की इशरत जहाँ मारली गेली त्या चकमकीबाबत २००९ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र यूपीएच्या दबावाखाली मोदी यांना अडकवण्याकरिता दिले होते व ती चकमक बनावट असल्याचे खोटेच सांगण्यात आले होते. दोन परस्परविरोधी प्रतिज्ञापत्रे यात सादर करण्यात आली होती.

अनुराग ठाकूर यांनी सांगितले, की यूपीए सरकारने मोदी यांना खोटय़ा आरोपाखाली अडकवण्याचा तो प्रयत्न होता, ते प्रतिज्ञापत्र कुणाच्या आदेशानुसार बदलले गेले हे आता देशाला सांगावे. काँग्रेस व भाकप यांनी त्यावर आक्षेप घेत सांगितले, की लोकसभाध्यक्ष काही ठराविक सदस्यांना बोलू देत आहेत.