हरयाणातील पलवल जिल्ह्यातील मशीद राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आली आहे. पलवल जिल्ह्यातील उत्तवार येथील मशिदीला ‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेने आर्थिक रसद पुरवल्याचे समोर आले आहे. एनआयएच्या पथकाने या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात मशिदीतील इमाम मोहम्मद सलमान याचाही समावेश आहे.

दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएच्या पथकाने २६ सप्टेंबर रोजी मोहम्मद सलमान (वय ५२) याच्यासह मोहम्मद सलीम आणि सज्जाद अब्दुल वानी यांना अटक केली होती. लाहोरमधील फलाह- ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संघटनेकडून त्यांना पैसे यायचे. ही संघटना हाफीज सईदने सुरु केली आहे.

एनआयएच्या तपासात पलवलमधील मशिदीची माहिती उघड झाली. पलवलमधील उत्तवार येथे खुलाफा-ए-रशीदीन ही मशीद असून या मशिदीच्या बांधकामासाठी ‘लष्कर’ने आर्थिक रसद दिली. सलमान हा दुबईत असताना दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. या मशिदीच्या बांधकामासाठी त्याला ७० लाख रुपये मिळाल्याचे तपासातून समोर आले आहे. या मशिदीत जमा होणाऱ्या देणग्यांचा वापर कुठे केला जात होता, याचा आता तपास सुरु आहे. ग्रामस्थांना सलमानच्या ‘लष्कर’ कनेक्शनविषयी माहिती नव्हती. या मशिदीचे बांधकाम जिथे झाले तो भूखंड वादग्रस्त होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मशिदीच्या कामासाठी सलमान पैसे आणत होता. मात्र, ते पैसे कोणत्या मार्गाने आले हे ग्रामस्थांना माहित नव्हते. या जागेवर काही कुटुंब राहत होते. मशिदीसाठी त्यांना ही जागा सोडावी लागली. यातूनच त्यांनी पोलिसांना चुकीची माहिती दिली असावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.