शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा भोगत असलेले हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला हे बारावीची (उच्च माध्यमिक परीक्षा) परीक्षा प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ८२ वर्षीय चौटाला यांनी आता पदवीची परीक्षेचीही तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या चौटालांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन लर्निंगमधून (एनआयओएस) बारावीचे शिक्षण घेतले. ओमप्रकाश यांचा छोटा मुलगा आणि हरियाणाचे विरोधी पक्षनेते अभयसिंह चौटाला यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
शेवटचा पेपर २३ एप्रिलला होता. त्यावेळी ते पॅरोलवर तुरूंगाबाहेर होते. तर परीक्षा केंद्र हे तुरूंगात होते. त्यामुळे त्यांना परीक्षा देण्यास तुरूंगात जावे लागले, अशी माहिती अभय चौटाला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिली. ओमप्रकाश चौटाला हे आपले नातू दुष्यंतसिंह चौटालाच्या लग्नासाठी एप्रिल महिन्यात पॅरोलवर आले होते. दि. ५ मे रोजी ओमप्रकाश चौटाला यांचा पॅरोल संपला.
अभयसिंह चौटाला म्हणाले, नुकताच बारावीचा निकाल लागला असून त्यात त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. त्यांनी आपली शिक्षेचा उपयोग सार्थक कारणासाठी करायचा असे ठरवले आहे. ते तुरूंगातील ग्रंथालयात नियमितपणे जातात. ते तिथे वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचतात. तुरूंगातील कर्मचाऱ्यांकडून आपले आवडते पुस्तकही मागवतात. जगातील महान नेत्यांच्या जीवनावर आधारित पुस्तके वाचण्यावर त्यांचा भर असतो. अनेकवेळा ते आम्हालाही पुस्तके पाठवण्यास सांगतात, असेही ते म्हणाले. अनेक अडचणी असतानाही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला, अशी माहिती निवृत्त आयएएस अधिकारी व ओमप्रकाश चौटाला यांचे निकटवर्तीय आर.एस. चौधरी यांनी सांगितले.
ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय चौटाला यांना वर्ष २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने वर्ष २००० मध्ये हरियाणा येथे झालेल्या ३२०६ शिक्षक भरतीत घोटाळा केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. या घोटाळ्याप्रकरणी ओमप्रकाश चौटाला आणि अभय चौटाला यांच्यासह ५३ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले होते.