आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस सामूहिक बलात्कारासारख्या घटनांना बेरोजगारी जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी अशा घटनेचा निषेध केला आणि त्याला बेरोजगारी जबाबदार असल्याचं सांगितलं. यासंदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्टही शेअर केली आहे.

“बलात्काराच्या वाढत्या घटनांमागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे देशात वाढणारी बेरोजगारी आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मी निषेध करतो आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याचंही मी आवाहन करतो. याकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन आहे आणि ज्याच्यावर विचार होणं अधिक आवश्यक आहे,” असं काटजू म्हणाले. “पुरुषांमध्ये शारीरिक संबंधांची नैसर्गिकरित्या तीव्र इच्छा असते. कधी कधी जेवणानंतरही ती दुसरी आवश्यकता असते. भारतातसारख्या पारंपारिक समाजात सामान्यत: लग्नानंतरच शारीरिरक संबंध ठेवता येतात. परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे आणि ती वाढत जात आहे. त्यामुळे तरूणांचे विवाह होत नाहीत. (बेरोजगारांसोबत मुली लग्नासाठी तयार होत नाहीत). यामुळेच सामान्य गरज असलेल्या वयात येऊनदेखील मोठ्या प्रमाणात तरूण शारीरिक गरजेपासून वंचित राहतात,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

“१९४७ मध्ये विभाजनापूर्वीच्या भारताची लोकसंख्या ४२ कोटी होती. आज केवळ एकट्या भारताची संख्या १३५ कोटी झाली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रोजगार वाढत नाहीत. जून २०२० मध्ये १२ कोटी भारतीय बरोजगार झाले असं म्हटलं जात आहे. तर काय अशा परिस्थितीत बलात्काराच्या घटना वाढणार नाहीत?,” असा सवालही त्यांनी केला.

“आपण बलात्काराच्या घटनेला योग्य ठरवत नाही तर त्याचा निषेधच करत आहोत. परंतु आज देशात जी परिस्थितीत आहे त्यावरून त्या वाढणं हे निश्चितच आहे. जर देशात अशा घटना कमी करायच्या असतील तर सामाजाकि आणि आर्थित व्यवस्था अशी करावी लागेल ज्याठिकाणी बेरोजगारी अतिशय कमी असेल,” असंही काटजू यांनी नमूद केलं. १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये क्रुरतेचा कळसही गाठण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.