जनता नव्हे तर काँग्रेसच्या कृपेवर माझे सरकार अवलंबून असल्याचे केलेले वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. भाजपा नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत कुमारस्वामी हे आपल्याच लोकांची थट्टा करत असल्याची टीका केली आहे. कुमारस्वामी हे राज्यात काँग्रेसच्या एटीएमचे ‘चीफ मॅनेजर’ असून गांधी परिवाराच्या चरणात ते लीन आहेत, असा टोला भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी ट्विट करत कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेत टिकून राहण्यासाठी कन्नड लोकांशी समजोता करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुमारस्वामी, कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री म्हणत आहेत की, ते सहा कोटी कन्नड लोक नव्हे तर काँग्रेसचे ऋणी आहेत. श्रीमान, मी तुम्हाला विचारू इच्छितो की, तुम्ही सत्तेत टिकून राहण्यासाठी कन्नड लोकांच्या हिताशी समजोता करू इच्छिता, भ्रष्टाचारी काँग्रेससाठी तुमची स्थानिक भूमिका काय आहे ? कुमारस्वामींनी इतके खालच्या दर्जाला जायची गरज नव्हती, असेही म्हटले.

कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे हे सिद्ध होते की, त्यांना कर्नाटकाच्या सहा कोटी लोकांची काही पर्वा नाही. आपल्याच लोकांची थट्टा करणे हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, अशा आशयाचे ट्विट भाजपाच्या कर्नाटकातील एका शाखेने केले आहे.

संबित पात्रा म्हणाले की, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. देशाच्या लोकशाहीचा हा अपमान असून कुमारस्वामी हे काँग्रेसच्या एटीएमचे चीफ मॅनेजर आहेत. दक्षिणेतील हे राज्य सरकार आता जनपथ येथून चालणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

जनता नव्हे काँग्रेसच्या कृपेवर सरकार अवलंबून: कुमारस्वामी

माझ्या पक्षाने एकट्याने सरकार बनवलेले नाही. मी लोकांना जनादेश मागितला होता. मी कोणाच्याही दबावात न येण्यासाठी जनादेश मागितला होता. पण आज मी काँग्रेसच्या कृपेवर आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावात नाही, असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले होते.