शालेय विद्यार्थ्यांमधील लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असतानाच आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका तासिका मैदानी खेळांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नववी ते बारावी या इयत्तांसाठी २०१८- १९ या शैक्षणिक वर्षातील वेळापत्रकांमध्ये त्यादृष्टीने बदल करावेत, अशा सूचनाही सीबीएसईने सर्व शाळांना दिल्या आहेत.

महाराष्ट्र तसेच अन्य काही राज्यांमधील शिक्षण मंडळाने शाळांमध्ये क्रीडा तास सक्तीचा केला आहे. आता सीबीएसईनेही याचे अनुकरण करत रोज एक तासिका खेळांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई शाळांमधील विद्यार्थी आता रोज या तासिकेच्या वेळी मैदातान जातील. या तासिकेला विद्यार्थी मंडळाने ठरवून दिलेल्या शारीरिक कसरतींपैकी एखादी कसरत करतील. मात्र, ती निवडण्याचे मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना गुणही दिले जाणार असून ही सर्व प्रक्रीया शालेय स्तरावर होणार आहे. याचे मूल्यमापन शाळेतील शिक्षकच करतील, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. मूल्यमापन बंधनकारक असले तरी या गुणांचा समावेश अंतिम निकालात होणार नाही. या तासिकेला आरोग्य आणि शारीरिक शिक्षण असे नाव देण्यात आले असून या तासिकेसाठी स्वतंत्र शिक्षक नियुक्त करण्याची आवश्यकता नाही, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.