नरेंद्र मोदी यांनी जेव्हा गुजराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांची आई हिराबेन मोदी यांनी एक कानमंत्र दिला होता. तू काय करतोस हे मला कळत नाही…पण तू कधीच लाच घेणार नाही असं आश्वासन दे असं हिराबेन मोदी यांनी नरेंद्र मोदींना सांगितलं होतं. स्वत: नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध सोशल मीडिया पेज ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना हे सांगितलं.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदींनी अजून एका गोष्टीचा खुलासा केला. आपण पंतप्रधानपदाची शपथ घेणं हा तिच्यासाठी सर्वात जास्त आनंदाचा क्षण नव्हता असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. ऐकून आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. पण नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे आपण पंतप्रधान झालो त्यापेक्षाही जास्त आनंद जेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री झालो तेव्हा आईला सर्वात जास्त आनंद झाला होता असा खुलासा केला आहे. यानित्ताने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आईची भेट घेतल्याची ती आठवण पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी सांगितली.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तो नाही तर ‘हा’ क्षण होता त्यांच्या आईसाठी सर्वात जास्त आनंददायी

‘अनेकदा लोक मला तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तुमच्या आईच्या काय भावना होत्या असं विचारतात. कारण प्रत्येक ठिकाणी माझं नाव घेतलं जात होतं, फोटो लावले जात होते, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. पण मला वाटतं माझ्या आईसाठी मी मुख्यमंत्री झालो तो मैलाचा दगड होता’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

आपल्याला गुजरातचं मुख्यमंत्रीपद मिळणार आहे कळलं तेव्हा आपण दिल्लीत होतो अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. शपथविधी पार पडण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये घरी जाऊन आईची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी अहमदाबादला पोहोचले तेव्हा सगळीकडे सेलिब्रेशन सुरु होते. हिराबेन मोदी यांना आधीच आपला मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होणार असल्याचं कळलं होतं.

‘पण आईने फक्त माझ्याकडे पाहिलं आणि मिठी मारली. नंतर म्हणाली तू आता गुजरातला परतलास याचा सर्वात जास्त आनंद आहे. आईचा स्वभाव असाच असतो. आजुबाजूला काय सुरु आहे याचं तिला काही नसतं फक्त आपलं मूल आपल्या जवळ असावं इतकीच अपेक्षा असते’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

यावेळी नरेंद्र मोदींनी आपल्या आईने एक कानमंत्र सांगितला जो आपण कायम लक्षात ठेवला असल्याचं सांगितलं. ‘ती म्हणाली होती तू काय करतोस हे मला कळत नाही…पण तू कधीच लाच घेणार नाही असं आश्वासन दे…कधीही हे पाप करु नकोस. तिच्या त्या शब्दांनी माझ्यावर छाप सोडली’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. ‘जुन्या दिवसांमध्ये जेव्हा तिला कोणी सांगायचं की तुमच्या मुलाला नोकरी मिळाली आहे ती संपूर्ण गावात मिठाई वाटायची. त्यामुळे तिला मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा गोष्टींचा फरक पडत नाही’, असंही नरेंद्र मोदी सांगतात.