महिला न्यायाधीशासोबत गैरवर्तणूक केल्याच्या आरोपावरून हिमाचल प्रदेशमधील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी तेथील एका मुख्य न्यायदंडाधिकाऱयांना गुरुवारी निलंबित केले. या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे उच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
हिमालच प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मन्सूर अहमद मीर यांनी ही कारवाई केली. गेल्या महिन्यात ११ ते १३ जून दरम्यान मनालीमध्ये न्यायाधीशांची एक परिषद बोलावण्यात आली होती. याच परिषदेवेळी संबंधित मुख्य न्यायदंडाधिकाऱयांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप महिला न्यायाधीशांनी केला होता. या परिषदेपूर्वी आपल्यासोबत रिसॉर्टमध्ये राहावे, अशी इच्छा संबंधित मुख्य न्यायदंडाधिकाऱयांनी व्यक्त केली. त्यानंतर महिला न्यायाधीशांनी याविरोधात उच्च न्यायालयात तक्रार केली. दरम्यान, संबंधित मुख्य न्यायदंडाधिकाऱयाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असल्याची माहिती मिळाली आहे.