हिमालयाचे तापमान इ.स. २०३०पर्यंत दोन अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे, तर तेथील पाऊस येत्या वीस वर्षांत ५ ते १३ टक्क्यांनी वाढेल, असे उत्तराखंड सरकारने तयार केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
उत्तराखंड सरकारच्या अहवालात असे म्हटले आहे, की इ. स. २०३०पर्यंत रोजच्या पृष्ठीय तापमानाच्या कमाल व किमान नोंदीत खूप फरक पडेल. त्यामुळे २०३०पर्यंत तापमानवाढ ही १ ते ४ अंश सेल्सियसने होईल.
विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी या अहवालातील अनेक बाबी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सोमवारी  जाहीर केल्या.
हवामानबदलाचे प्रतिकूल परिणाम या अहवालात दिले आहेत. उत्तराखंड सरकारच्या अहवालानुसार सरासरी वार्षिक तापमानात इ.स. २०३०पर्यंत ०.९ (अधिक उणे ०.६ सेल्सियस) अंश ते २.६ अंश (अधिक उणे ०.७ अंश सेल्सियस) याप्रमाणे फरक पडेल. त्याचबरोबर देशाच्या इतर बहुतांश भागात पावसाचे दिवस कमी होणार आहेत, पण ईशान्य व हिमालय व दक्षिण पठाराच्या भागात ते कमी होणार नाहीत.
पावसाची तीव्रता आग्नेय किनारा, ईशान्य व हिमालयाच्या भागात २ ते १२ टक्के वाढणार आहे.
हिमालयाच्या क्षेत्रात पाण्याचे प्रमाण १९७०च्या तुलनेत ५ ते २० टक्के वाढणार आहे. त्यात जम्मू-काश्मीर व उत्तराखंडमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढेल, असेही अहवालात म्हटले आहे.

अहवालातील मुद्दे
* तापमानात दोन अंश सेल्सियस वाढ होणार
* देशाच्या इतर भागात पाऊस कमी होणार
* हिमालय व ईशान्येत पाऊस ५ ते २० टक्के वाढणार