काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देशाला लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू मुलतत्ववादी संघटनांकडून अधिक धोका असल्याचे वाटते, असा दावा भाजपाने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. त्यासाठी त्यांनी विकिलिक्सच्या कागदपत्रांचा दाखला दिला आहे. संबित पात्रा यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.


संबित पात्रा म्हणाले, २००९मध्ये अमेरिकेचे भारतातील अॅम्बेसिडर टिमोथी रोमर यांना तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जेवणाचे निमंत्रण दिले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी टिमोथी आणि राहुल यांच्यात चर्चा झाली. या चर्चेची माहिती टिमोथी यांनी युएस स्टेट डिपार्टमेंटला एका टेलिग्रामद्वारे दिली होती. यामध्ये त्यांनी सांगितले की, राहुल गांधी आणि काही तरुण काँग्रेस खासदारांसोबत आमच्या चर्चेदरम्यान जी काही माहिती समोर आली ती आम्ही अमेरिकेकडे पाठवत आहोत.

या टेलिग्राममध्ये म्हटले आहे की, राहुल गांधींना अमेरिकेच्या राजदूतांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेबाबत आपले मत विचारले त्यावर बोलताना ते म्हणाले की, लष्करचे भारतात अस्तित्व आहे. त्यांना भारतातील मुस्लिमांच्या काही गटांचा पाठींबाही असू शकतो. मात्र, लष्कर-ए-तोयबा जास्त महत्वाची नाही. त्यापेक्षा भारताला सर्वांधिक धोका हा मुलतत्ववादी हिंदू संघटनांकडून आहे. या हिंदू संघटना कायम मुस्लिम समाजाला त्रास देत असतात. हे मुलतत्वादी हिंदू ज्या दहशतवादी संघटना तयार करीत आहेत त्यांच्याकडूनच देशाला सर्वाधिक धोका आहे.

राहुल गांधींच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना टिमोथी म्हणतात की, जातींचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपामधील अनेक लोक काम करीत आहेत. त्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसारख्या लोकांच्या समावेश आहे. यावरुन राहुल गांधींना लष्करपेक्षा जास्त धोका हिंदूपासून वाटतो का? असा प्रश्न पात्रा यांनी केला. राहुल गांधी यांनी लष्करपासून नव्हे तर नरेंद्र मोदींपासून देशाला अधिक धोका असल्याचे म्हटले आहे. यावरुन ते पाकिस्तानाला पाठींबा देत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

अमेरिकेवर हल्ला करणारा ओसामा बिन लादेनच्या पैशांवर जी लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना सुरु आहे. ती राहुल गांधींना कमी महत्वाची वाटते. त्यापेक्षा त्यांना हिंदूपासून अधिक भिती वाटते. अनेक देशांमध्ये लष्कर-ए-तोयबावर बंदी आहे, मात्र तरीही तुम्ही त्यांची पाठराखण करता, याचे तुम्हाला उत्तर द्वावे लागेल, असे यावेळी पात्रा म्हणाले.