उत्तर प्रदेशातील खतौलीजवळ झालेल्या रेल्वे अपघातात आत्तापर्यंत २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि १५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारे अनेक प्रवासी वाचले आहेत. या एक्स्प्रेसमधून काही साधूही प्रवास करत होते, या साधूंनी सांगितलेले अनुभव तर अंगावार शहारे आणणारे आणि माणुसकीचं दर्शन कसं घडलं ते सांगणारे आहेत.

अचानक अपघात झाला आणि चारही बाजूंनी किंचाळण्याचे आवाज ऐकायला आले, काय घडतं आहे हे आम्हाला कळत नव्हतं, मात्र आम्ही सगळे खूप घाबरून गेलो होतो. त्या क्षणी अगदी वेळेवर काही मुस्लिम बांधव आले आणि त्यांनी आमचा जीव वाचवला. मुस्लिम बांधव अपघाताच्या ठिकाणी आमचा जीव वाचविण्यासाठी धावले नसते तर आम्ही आज जिवंत नसतो अशी प्रतिक्रिया या साधूंनी दिली आहे.

जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी एक भयंकर आवाज झाला, या आवाजामुळे माझं डोकं प्रचंड दुखायला सुरूवात झाली, त्याचवेळी काही मुस्लिम बांधव तिथे आले आणि त्यांनी मला अपघातग्रस्त डब्यातून बाहेर काढलं असा अनुभव भगवान दास नावाच्या एका साधूनं सांगितला आहे. माझं डोकं मी बसलो होतो त्या सीटखाली दाबलं गेलं होतं आणि चारही बाजूंनी मला फक्त किंचाळण्याचे आवाज येत होते, त्याचवेळी मुस्लिम बांधव आले आणि मला या संकटातून बाहेर काढलं, मला रूग्णालयात घेऊन गेले. मला एकट्यालाच नाही तर माझ्यासोबत असलेल्या इतर साधूंनाही त्यांनी या संकटातून बाहेर काढलं, आमच्या उपचारांची आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. अपघात झाल्यानंतर काही क्षणांतच मुस्लिम बांधवांनी जी माणुसकी दाखवली ती आम्ही कधीही विसरू शकत नाही असंही दास यांनी म्हटलं आहे.

अनेकदा राजकीय नेते आणि पुढारी हे हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांतील लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र अशा नेत्यांनी असे प्रसंग बघायला हवेत. अपघाताच्या ठिकाणी आम्हाला फक्त माणुसकीचं दर्शन घडलं कोणताही धार्मिक रंग त्या ठिकाणी आड आला नाही. मुस्लिम बांधवांप्रमाणेच इतर अनेक लोकांनी माणुसकी आणि आपुलकीच्या भावनेतून आम्हाला आणि अपघातात अडकलेल्या प्रत्येक प्रवाशांना मदत केली असंही एका साधूने म्हटलं आहे.

शनिवारी संध्याकाळी ५. ४४ च्या सुमारास हरिद्वारला जाणाऱ्या उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे खतौलीजवळ घसरले. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसंच या अपघातातून जे प्रवासी वाचले आहेत त्यांचे अनुभव आता समोर येत आहेत.