पाकिस्तानातील दक्षिण सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तींनी एका शहरातील वार्षिक जत्रेच्या दोन आठवडे अगोदर एका मंदिराची विटंबना करून ते जाळून टाकले.
लतिफाबाद येथील हे मारूतीचो मंदिर असून त्याच्या काळजीवाहू पुजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, तीन जण प्रार्थनेसाठी आले. त्यांनी प्रार्थना केल्यानंतर  हनुमानाची मूर्ती फोडली व रॉकेल ओतून जाळली. अंतरिम काळजीवाहू पुजारी दर्शन यांनी सांगितले की, मदत मागेपर्यंत हल्लेखोर पळून गेले. समाजकंटकांनी चेहरे झाकलेले होते व त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. १४ एप्रिलला दरवर्षी मंदिर परिसरात यात्रा होते त्या आधीच हा हल्ला झाला आहे. मंदिर परिसरात अनुसूचित जाती-जमातीचे ५००-६०० लोक राहतात. त्यांनी शहरात ठिकठिकाणी निदर्शने केली. प्राथमिक चौकशीनुसार हा हल्ला जातीय स्वरूपाचा नव्हता. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक व स्टेशन हाऊस ऑफिसर यांना निलंबित करण्यात आले. पोलीस उपमहानिरीक्षक सनाउल्ला अब्बासी यांनी सांगितले, की तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.पाकिस्तानात हिंदूू अल्पसंख्याक असून देशाच्या १८ कोटी लोकसंख्येत त्यांचे प्रमाण २ टक्के आहे. सिंध प्रांतात अनेक हिंदू लोक आहेत. तेथे महिलांचे अपहरण, धर्मातर असे प्रकार वारंवार घडत आहेत.