जगात हिंदू हा एकमेव धर्म असून उर्वरित सर्व संप्रदाय आहेत, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पतंजली योगपीठात आयोजित कार्यक्रमात केले. आपण सर्व जण मूळचे हिंदूच आहोत. हिंदू धर्माचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असेही ते म्हणाले.

भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजली योगपीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. जगात हिंदू हा एकमेव धर्म आहे. या धर्माचे दरवाजे सर्वांसाठीच खुले आहे. आम्ही (संघ) हिंदू निर्माण करत नाहीत. कारण आपल्या सर्वांचे पूर्वज हे हिंदूच आहेत, असेही ते म्हणाले. हिंदू धर्माचे दरवाजे सर्वांसाठी आजही खुले आहेत. कारण आपण सर्व जण मूळचे हिंदूच आहोत असे आम्ही मानतो, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, भागवत पतंजली योगपीठात पोहोचल्यानंतर रामदेव बाबा आणि इतरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी रामदेव बाबा यांनी त्यांना गदा भेट दिली आणि हिंदुत्वाची मशाल अशीच तेवत ठेवा, असे आवाहन केले. योगपीठात जाण्यापूर्वी सरसंघचालकांनी कनखल येथील सूरतगिरी आश्रमात गंगा पूजन आणि आरती केली. त्यानंतर संतांनी त्यांना आशिर्वाद देऊन दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनीही सूरतगिरी आश्रमात त्यांची भेट घेतली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी रावत यांनी त्यांना पुस्तक आणि केदारनाथांचे स्मृतीचिन्ह भेट दिले. कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा आणि कॅप्टन मनोज पांडे यांच्या आई-वडिलांना भागवत यांच्या हस्ते गौरवण्यात आले.