काश्मीर खो-याला भारतीय सैन्याची दफनभूमी बनवू अशी, दर्पोक्ती करणारा हिजबूल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन याला भाजपकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवणाऱ्या बुरहान वानीचा जसा अंत झाला तशाचप्रकारे सय्यद सलाउद्दीनचाही शेवट होईल. काश्मीरला भारतीय सैन्याची दफनभूमी बनवण्याची धमकी देणाऱ्या सय्यद सलाउद्दीनने ही गोष्ट लक्षात घ्यावी, असे भाजप प्रवक्त्या शायना एन सी यांनी सोमवारी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. केंद्र सरकार काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात हातावर हात ठेवून बसणारे नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याठायी फुटीरतावाद्यांचा सामना करण्याच्यादृष्टीने राजकीय इच्छाशक्ती आणि ठाम निर्धार आहे. ही गोष्ट हिजबूल मुजाहिद्दीन आणि सय्यद सलाउद्दीनने लक्षात घेतली पाहिजे, असे शायना एन सी यांनी सांगितले.

सय्यद सलाउद्दीन याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काश्मीर प्रश्नावर शांतीचर्चा करुन उपयोग नसून काश्मीरमध्ये सशस्त्र लढा करण्याचीच गरज आहे असे सांगत आत्मघाती दहशतवाद्यांना पाठवून काश्मीर खो-याला भारतीय सैन्याची दफनभूमी बनवू अशी धमकी दिली होती. भारत काश्मीरला जोपर्यंत वादग्रस्त जागा म्हणून संबोधित करणे थांबवत नाही तोपर्यंत चर्चा अशक्य आहे असेही सलाउद्दीनने म्हटले होते. जम्मू काश्मीरमधील जनता आणि नेत्यांनी काश्मीर प्रश्नावर औपचारिक आणि शांतीपूर्ण मार्ग नाही हे लक्षात ठेवावे असे सलाउद्दीनने म्हटले आहे. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय खासदारांचे पथक जम्मू काश्मीर दौ-यावर दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर सलाउद्दीनने हे चिथावणीखोर विधान केले आहे. हिजबूलचा कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूनंतर काश्मीर आंदोलन महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचले आहे. वानीच्या मृत्यूनंतर दोन महिने संचारबंदी लागू करण्यात आली. पण आम्ही आंदोलनातील बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असेही सलाउद्दीनने सांगितले. ती लोक बळाचा वापर करुन फुटिरतावादी आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणा-या तरुणांच्या आंदोलनाला आणखी बळ देतील असा दावाही त्याने केला. आम्हाला आमची ताकद दाखवावी लागेल. काश्मीरचा हा संघर्ष फक्त काश्मीरपर्यंत राहणार नाही. संपूर्ण पट्ट्यातच या संघर्षाचा परिणाम दिसून येईल असेही त्याने म्हटले आहे.