श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई
श्रीनगर : श्रीनगर शहराजवळ रविवारी झालेल्या पोलीस चकमकीत हिज्बूल मुजाहिद्दीनचा (एचएम) म्होरक्या डॉ. सैफुल्ला ठार झाला. सैफुल्ला मारला जाणे हे सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेले मोठे यश असल्याचे मानले जाते.
श्रीनगर जवळील रानग्रेथ परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या परिसराला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यावर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. त्यात एक दहशतवादी ठार झाला. तो हिज्बूलचा कमांडर डॉ. सैफुल्ला असल्याची खात्री पोलिसांनी केली. घटनास्थळावरून पोलिसांनी आक्षेपार्ह दस्तऐवज, शस्त्रे आणि स्फोटके हस्तगत केली.
डॉ. सैफुल्ला चकमकीत ठार होणे, हे पोलीस आणि सुरक्षा दलांचे मोठे यश आहे, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी वार्ताहरांना सांगितले.
सैफुल्ला येथील एका घरामध्ये लपून बसला असल्याची खबर मिळाली होती, त्यामुळे सुरक्षा दलांनी वेढा घालून कारवाई केली. त्यात ठार झालेला दहशतवादी सैफुल्ला असल्याची खातरजमा करण्यात आली, असे विजयकुमार म्हणाले. घटनास्थळावरून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘हिज्बूल’चा म्होरक्या रियाझ नायकू मेमध्ये मारला गेल्यानंतर डॉ. सैफुल्ला या संघटनेचा कमांडर बनला होता. सुरक्षा दलांवर अनेक हल्ले करण्यात त्याचा हात होता. त्यामुळे सुरक्षा दले त्याचा कसून शोध घेत होती.
गिलगीट-बाल्टीस्तानला प्रांतीय दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयास भारताचा विरोध
नवी दिल्ली : गिलगीट-बाल्टीस्तानला प्रांताचा दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारताने रविवारी तीव्र विरोध केला. गिलगीट-बाल्टीस्तान हा भारताचा भाग असून तो पाकिस्तानच्या बेकायदा ताब्यात आहे. तो आपलाच भाग असल्याचे भासवण्यासाठी त्याला प्रांतीय दर्जा देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याच्या भौतिक रचनेत बदल करण्यास आणि प्रांतीय दर्जा देण्यास भारताचा विरोध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. पाकिस्तानने हा भाग त्वरित रिकामा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. गिलगीट-बाल्टीस्तानला प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 1:43 am