२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिंधू याला पोलिसांनी अटक केलीये. गुरूवारी त्याच्या जामिन अर्जावर दिल्ली कोर्टात सुनावणी झाली. यावेळी त्याने आपल्या वकिलांमार्फत ध्वजारोहण हा गुन्हा नाही, पण लाल किल्ल्यावरुन फेसबुक लाइव्ह करुन चूक केली असं म्हटलं.

कोर्टात वकील अभिषेक गुप्ता यांनी दीप सिंधू याची बाजू मांडली. यावेळी त्यांनी सिंधूवर लावलेले सर्व आरोप फेटाळले. “मी झेंडा फडकवला नाही किंवा अन्य कुणाला फडकवण्यासही सांगितलं नाही. ध्वजारोहण करणे हा काही गुन्हा नाही, हा चर्चेचा मुद्दा आहे पण त्यात मला पडायचं नाही. पण प्रत्येक चूक हा काही गुन्हा नसतो…मी फेसबुक लाइव्ह करुन चूक केली… कारण फेसबुक लाइव्ह करण्यासाठी मला देशद्रोही म्हटलं गेलं”, असं सिंधूने आपल्या वकीलांकरवी म्हटलं. पुढे बोलताना, निषेधाचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे असं म्हणत दीपचा हिंसाचारात सहभाग होता किंवा हिंसा भडकवण्यात सहभाग होता याचे कोणतेही पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत, असं गुप्ता म्हणाले. सिंधू लाल किल्ल्यावर बराच उशीरा पोहोचला होता, असंही त्यांनी सांगितलं. दीप सिंधूचे वकील अभिषेक गुप्ता यांनी सिंधूचा कोणत्याही शेतकरी संघटनेशी संबंध नसल्याचं सांगितलं. ट्रॅक्टर रॅलीसाठीही त्याने इतरांना उकसवलं नव्हतं, शिवाय लाल किल्ल्यावरही जाण्यासाठीही त्याने इतरांना सांगितलं नव्हतं, असा युक्तिवाद केला.

तर, सरकारी वकिलांनी सिंधू फक्त हिंसाचारातच सहभागी नव्हता, तर एक दिवस आधी त्याने सर्व कट रचला होता असा युक्तिवाद करत त्याच्या जामिनाला विरोध केला. सिंधूने झेंडा फडकवण्यासाठी लोकांना उकसवलं. मुलभूत अधिकाराच्या नावाखाली हिंसाचार करण्यात आला. जे पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते त्यांना कोणता अधिकार नाहीये का…कामावर असताना त्यांच्यावर हल्ला झाला… असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. आता १२ एप्रिल रोजी सिंधूच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान २६ जानेवारी रोजी दिल्लीत हिंसाचार झाला होता. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यानंतर दीप सिंधूला अटक झाली.