बाबरी मशीद अजूनही त्याच जागी आहे, होती आणि राहिल तसेच सुप्रीम कोर्टाचा निकाल जर आमच्या बाजूने आला तर आम्ही ती पुन्हा त्याच ठिकाणी उभारणार. कोर्टाचा निकालही येईल तो केवळ पुराव्यांच्या आधारावर येईल आस्थेच्या नव्हे, अशी आम्हाला आशा वाटते, असे एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दिन ओवेसी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.


ओवेसी म्हणाले, आम्ही हिंदू-मुस्लिम भाई-भाईच्या खूप घोषणा दिल्या. मात्र, तरीही आम्हाला या देशात दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवण्याची स्वप्न काही लोक पाहत आहेत, त्यांच्यामुळे आम्ही मुसलमान तर झालोच नाही मात्र, ते हिंदू राष्ट्राच्या दिशेने जरूर गेले आहेत.


जे आजही आम्हाला पाकिस्तानी म्हणून हिणवतात त्यांना मला विचारायचे आहे की, हर्षद मेहता, केतन पारेख आणि नीरव मोदी हे मुसलमान होते का? आमच्या पंतप्रधानांनी एकाला मेहुल भाई असे संबोधले, ही व्यक्ती मुसलमान होती का? असे सवाल यावेळी ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींना केला.

हे लोक आम्हाला घाबरवत आहेत. आमच्या शरियतविरोधात ते आवाज उठवत आहेत. आम्हाला बाबरी मशीदीवरील हक्क ते सोडायला सांगत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही आमची मशीद कदापी सोडणार नाही, असेही ओवेसी यावेळी हिंदुत्ववाद्यांवर टीका करताना म्हणाले.