मेंदूच्या होणाऱ्या हानीमुळे माणसाला पक्षाघाताचा झटका येतो. यात शरीराचा काही भाग लुळा पडतो, पण मेंदू या पक्षाघाताच्या विकारास नैसर्गिकरित्या तोंडही देत असतो. ते प्रयत्नही निष्फळ ठरल्यानंतर  पक्षाघात होतो, असे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांचे मत आहे.उंदरांमध्ये पक्षाघातास कारण ठरणाऱ्या दोषांचा सामना करून ते दुरूस्त करणारी जैविक यंत्रणा असते असे दिसून आले आहे. ही जैविक व्यवस्था नेमकी कशी आहे याच्या अभ्यासाअंती पक्षाघातावर उपचार करणे सोपे जाणार आहे. मेंदूतील पेशींचा ऱ्हास झाल्याने होणाऱ्या रोगांवर उपाय करणे यापुढे शक्य होणार आहे.
मुख्य संशोधक अलेस्टर बुचन यांनी सांगितले की, मेंदू स्वत:चे संरक्षण अशा जैविक व्यवस्थेच्या माध्यमातून करीत असतो, हानी भरून काढत असतो, दोष दूर करीत असतो. पेशी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो.
जेव्हा मेंदूचा रक्तपुरवठा काही प्रमाणात बंद होतो तेव्हा पक्षाघाताचा झटका येतो. असे घडते त्यावेळी मेंदूतील पेशींना ऑक्सिजन व पोषके मिळत नाहीत त्यामुळे त्या मरू लागतात, परिणामी मेंदूचे कार्य बिघडते. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर जेवढय़ा कमीत कमी वेळात तुम्हाला रूग्णालय गाठता येईल त्यावर उपचारांचे यश अवलंबून असते.मेंदूत गाठ असेल तर ती औषध देऊन विरघळवता येते व रक्तप्रवाह पुन्हा सुरू होऊ शकतो. त्यामुळे मेंदूच्या पेशी मरण्यापासून वाचतात.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मेंदूची जी स्वसंरक्षण प्रणाली आहे तिचे एक स्वरूप शोधले असून प्रणालीला एंडोजिनस न्यूरोप्रोटेक्शन असे म्हणतात. पंचाऐशी वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या एका निरीक्षणाच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. १९२६ पासून आपल्याला हे ज्ञात आहे की, हिप्पोकॅम्पस या मेंदूच्या एका भागातील न्यूरॉन्स हे ऑक्सिजनअभावीही जिवंत राहतात. हिप्पोकॅम्पस हा माणसाच्या स्मृती जतन करणारा मेंदूचा एक भाग आहे.
 उंदरांवर प्रयोग
 हिप्पोकॅम्पसच्या इतर भागातील पेशी मात्र मरतात. काही पेशी ऑक्सिजनवाचून मरतात काही मरत नाहीत. असे का घडते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्याबाबत डॉ. मिशलिस पापाडाकिस यांनी पहिला शोधनिबंध लिहिला होता. उंदरांवर करण्यात आलेल्या संशोधनात असे दिसून आले की,हॅमरटिन या विशिष्ट प्रथिनाच्या निर्मितीमुळे हिप्पोकॅम्पसमधील या विशिष्ट पेशी ग्लुकोज व ऑक्सिजनअभावी जिवंत राहू शकतात. पक्षाघातामुळे याच कारणामुळे मेंदूच्या पेशी मरत असतात.
संशोधनास प्रसिद्धी
मेंदूच्या इतर भागातील न्यूरॉन्स हॅमरटिन या प्रथिनाअभावी मरतात. हॅमरटिनची निर्मिती सुधारल्यास न्यूरॉन्सचे संरक्षण होते असेही दिसून आले आहे.
 ज्या जैविक मार्गिकेने हॅमरटिन पेशींपर्यंत पोहोचून त्यांना वाचवते ती सापडली आहे. ‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.