कोळसा खात्याचे माजी सचिव पी. सी. पारख यांनी कोळसा घोटाळ्यामध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचीही कारस्थान रचणाऱयांमध्ये गणना करण्याची मागणी केल्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष भाजपनेही पंतप्रधानांवर निशाणा साधला. कोळसा खाण वाटपाला अंतिम मंजुरी देणारी व्यक्ती आपली जबाबदारी कशी काय टाळू शकते, असा प्रश्न भाजपचे नेते आणि खासदार यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, पारख यांनी स्पष्टपणे आपली मते मांडण्याची वेळ आली आहे. ते कोळसा सचिव असताना आणि पंतप्रधानांकडे कोळसा खात्याची जबाबदारी असताना फायली कशा पद्धतीने मंजूर करण्यात आल्या, याची माहिती त्यांनी खुलेपणाने दिली पाहिजे. कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे कोळसा खाणींच्या वाटपासाठी कशा पद्धतीने चिठ्ठ्या येत होत्या आणि त्यानंतर कोळसा मंत्रालयाला खाणींच्या वाटपासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून कसे निर्देश दिले जात होते, याची माहिती पारख यांनी द्यावी, अशी मागणी यशवंत सिन्हा यांनी केली.