काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या हरियाणातील जमीन व्यवहार प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. हरियाणात काँग्रेस सरकार असताना वढेरा यांच्या जमीन लिलाव प्रकरणातील फाईल्समधील दोन महत्त्वाची पाने गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. खुद्द हरियाणा सरकारने याबाबत पुष्टी केली आहे.
आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी माहिती अधिकाराने संबंधित कारभाराची माहिती मागविली होती. त्यावरील स्पष्टीकरणात जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समिती संदर्भातील माहिती नमूद करण्यात आलेली दोन पाने गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.  
विशेष म्हणजे या त्रिसदस्यीय समितीने वद्रांची कंपनी स्कायलाईटला क्लिन चीट दिली होती. राज्याचे मुख्य सचिव पी.के.गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमका यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत वद्रांच्या जमीन व्यवहार प्रकरणाच्या माहितीची मागणी केली होती. त्यानुसार खेमका यांना कागदपत्रे उपलब्धही करून देण्यात आली परंतु, त्यातील काही पाने गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. गहाळ झालेली पाने तातडीने शोधण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधितांवर कठोर कारवाई करू, असेही गुप्ता म्हणाले.