लडाखमधील गलवान खोऱ्यात सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव असतानाच चीनने पुन्हा एकदा आगळीक करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना रोखलं असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सैनिकांनी प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगत चीनला इशारा दिला आहे. मात्र नुकत्याच घडलेल्या या संघर्षाच्या वेळी नक्की घडामोडी कशा घडल्या याबद्दलची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २०० चिनी सैनिक २९ ऑगस्टच्या रात्री ११ च्या सुमारास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दिशेने कूच करु लागले. एसयुव्ही गाड्यांमध्ये हे सैनिक भारत चीन सिमेच्या दिशेने निघाले. या सिमेवर असणाऱ्या भारतीय चौकीजवळ गोंधळ निर्माण करत भारतीय प्रदेशात घुसखोरी करण्याचा त्यांचा इरादा होता अशी माहिती इंडिया टु डेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र चिनी सैनिकांच्या या नापाक इराद्याबद्दल भारतीय यंत्रणांना आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे या प्रदेशातील परिस्थिती हाताळ्याच्या दृष्टीने भारतीय सैन्याने आधीच सर्व तयारी करुन ठेवली होती.

चिनी सैनिकांचा ताफा भारतीय चौकीजवळ आला. या गाड्यांमधून चिनी सैनिक खाली उतरले आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे कूच करु लागले. मात्र चिनी लष्कर असं काहीतरी करणार याबद्दलचा अंदाज असल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सैनिक तैनात होते. अगदीच अनपेक्षितपणे भारतीय सैनिकांचा फौजफाटा पाहून चिनी सैनिकांना धक्का बसला. त्यानंतर रात्रीच्या अंधारातच दोन्ही बाजूकडील सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलं. दोन्ही बाजूकडील सैनिकांमध्ये काही मिनिटांसाठी झटापट आणि धक्काबुक्की झाली. चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या नियंत्रणात असणाऱ्या प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते तर भारतीय सैनिकांनी त्यांना अडवून धरले होते. थोड्या मिनिटांसाठी झटापट झाल्यानंतर दोन्हीकडील सैन्य काही काळ एकमेकांसमोर उभे होते. अखेर चिनी सैनिकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. या झटापटीदरम्यान कोणतीही जिवितहानी अथवा जखमी झालेले नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेक परिसरात चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना वेळीच रोखलं. २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्यांकडून हा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला.

चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार ही झटापट पँगाँग लेक परिसरामध्ये झाली. “चिनी सैनिक कायमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान करत त्याचे पालन करतात. त्यांनी कधीच ही रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही. या ठिकाणी निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी तेथे उपस्थित असणारे दोन्ही बाजूचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत,” असं झाओ म्हणाले आहेत. “चर्चा आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन्ही बाजू एकमेकांच्या संपर्कात असल्याचे मी म्हटलं आहे. याबद्दल काही बैठकी आणि चर्चा झाल्या तर त्याबद्दलची माहिती आम्ही देऊ,” असंही झाओ यांनी पुढे म्हटलं आहे.

२९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या प्रकारानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असून ब्रिगेड कमांडर स्तरावरील फ्लॅग मीटिंग चुशूल येथे सुरु आहे. मागील अनेक दिवसांपासून बैठकी आणि चर्चांचे सत्र सुरु असून दोन्हीकडील अधिकारी आणि कमांडर असलेल्या अनेक बैठकी मागील काही दिवसांमध्ये झाल्या आहेत. अनेक प्रदेशांसंदर्भातील चर्चांदरम्यान दोन्ही बाजूंचे मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. खास करुन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील प्रदेशाबद्दल तिव्र मतभेद असल्याचे समजते. यापूर्वी जूनमध्ये (१५ जून) भारत आणि चीनच्या सैन्यात गलवान खोऱ्यात जोरदार झटापट झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी व्हावा यासाठी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही देशांचे सैनिक भिडल्याचं वृत्त आलं आहे. यामुळे सीमेवरील तणाव अजूनही कमी झालेला नसल्याचं स्पष्ट होत असून चिनी सैन्य पूर्व लडाखमधून मागे हटायला तयार नसल्याचंही समोर येत आहे.