पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदी सरकारवर यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विचारलेल्या प्रश्नावरून एख ट्वटि केलं आहे.

ज्यामध्ये राहुल गांधी म्हणतात, “ प्रश्न तर योग्य आहे, मात्र सरकारच्या उत्तराची देश कधीपर्यंत वाट पाहणार? जर, कोविड अॅक्सेस स्ट्रॅटेजीच मन की बात असती. ” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. सोबतच अदर पूनावाला यांनी आरोग्य मंत्रालयास केलेल्या प्रश्नाबाबतचे वृत्त देखील संदर्भासाठी जोडले आहे.

 

तर “ पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे.” असे अदर पूनावाला यांनी काल टि्वट करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विचारले होते. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी पीएमओ इंडियला टॅग केले आहे.

“मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण, तशी आपल्याला योजना आखावी लागेल. आपल्या देशाची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी आणि वितरणासंदर्भात देशातील व परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल” असे अदर पूनावाला यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. सध्या भारतासह जगभरात ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्यास सुरु आहेत. सध्याच्या घडीला लस हाच करोना व्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. कारण अजूनही देशभरात स्थिती सामान्य झालेली नाही. देशात दररोज नव्या करोना बाधितांची नोंद होत असून मृत्यूही होत आहेत. भारतात आतापर्यंत लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. हजारो लोकांना या साथीच्या आजारात आपले प्राण गमवावे लागले आहेत.