भोपाळ : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मूळ राज्य म्हणजे मध्य प्रदेश. या राज्याशी त्यांचा अगदी निकटचा संबंध नेहमीच राहिला. दोनदा ते याच राज्यातून लोकसभेवर निवडून गेले. नंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा २२ वर्षांपूर्वी याच राज्यात करण्यात आली.

वाजपेयी यांचा जन्म ग्वाल्हेरचा. राजवाडे व किल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातून वाजपेयी जनसंघाचे उमेदवार म्हणून १९७१ मध्ये लोकसभेवर निवडून गेले. ग्वाल्हेर येथे त्यांच्या चाहत्याने त्यांचे मंदिर आधीच बांधलेले आहे. भाजपचे नेते वाजपेयी हे विदिशा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

धार जिल्हय़ातील मनवर येथे आदिवासी बहुल पट्टय़ात जी सभा झाली होती त्यात त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी भाजपचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभात झा यांनी सांगितले, की त्या ऐतिहासिक सभेला मी उपस्थित होतो. धार जिल्हय़ात त्या सभेला मोठय़ा संख्येने आदिवासी उपस्थित होते. त्या वेळी १९९६ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. ती बातमी देशभर पसरली व त्याच वर्षी वाजपेयी पंतप्रधान झाले. त्या अर्थाने वाजपेयी हे द्रष्टे नेते होते.

धार जिल्हय़ातील मनावर येथे अगदी दूरस्थ आदिवासी भागात झालेल्या सभेत अडवाणी यांनी ही घोषणा केली. त्यानंतर १९९६ मध्ये वाजपेयी १३ दिवस पंतप्रधान झाले. नंतर १३ महिने पंतप्रधान झाले व १९९९ ते २००४ या काळात ते पूर्णवेळ पंतप्रधान झाले. वाजपेयी यांचा जन्म ग्वाल्हेर येथे २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कृष्णादेवी व कृष्णबिहारी वाजपेयी यांचे ते पुत्र. शिंदे की छावनी भागात ते जन्मले. त्यांचे शिक्षण शिवपूर येथे झाले. नंतर ते ग्वाल्हेरला आले. तेथे त्यांनी गोरखी उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. वाजपेयी यांचे हिंदीचे प्रेम बघून विजय सिंह चौहान यांनी १९९५ मध्ये सत्य नारायण की टेकडी या ग्वाल्हेरमधील भागात चौहान यांनी वाजपेयी यांचे मंदिर बांधले होते.