नोटबंदीनंतर नव्या नोटा छापण्याच्या प्रक्रियेवर सहा महिन्यांपूर्वीच काम सुरू केले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. हे जर खरे असेल तर मग नव्या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही कशी? त्यांनी तर गव्हर्नरपदाची सूत्रे सप्टेंबरमध्ये स्वीकारली आहेत, असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

मध्य प्रदेशातील नेपानगर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले. पत्रकारांशी बोलताना मोहन प्रकाश म्हणाले की, ‘५०० आणि हजारच्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर नवीन नोटा चलनात आणण्याची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पण या नोटांवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांची सही कशी? कारण त्यांनी यावर्षीच सप्टेंबरमध्ये गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.’

यावेळी मोहन प्रकाश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विदेशी दौऱ्यांवर जाणाऱ्या उद्योगपतींवरही निशाणा साधला. काळा पैसाप्रकरणी जे दोषी आढळून आले आहेत. ते पंतप्रधान मोदींच्या सोबत विदेशी दौरा करत आहेत आणि देशातील कष्टकरी, गरीब लोक काही दिवसांपासून अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्याच्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत, असेही ते म्हणाले.