इराकमधील हिंसाचारग्रस्त नजफ प्रांतात तब्बल १०० भारतीय नागरिक अडकून पडल्याची खळबळजनक माहिती आता समोर येत आहे. मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेने पुराव्यांच्या आधारे अशाप्रकारचा दावा केला आहे. या संस्थेला इराकमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या काही भारतीय नागरिकांशी संपर्क साधण्यात यश आले. इराकच्या नजफ प्रांतात राहणाऱ्या या कामगारांचे पासपोर्ट संबंधित नोकरदार कंपन्यांच्या ताब्यात असून, या कंपन्यांनी हे पासपोर्ट परत करण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे या भारतीय नागरिकांना इराकमधून निघणे अशक्य झाले असून, त्यांना धोका निर्माण झाल्याचे ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ने म्हटले आहे. बगदादमध्ये असलेल्या भारतीय दुतावासाकडून काही पावले उचलण्यात येतील अशा आशेवर हे नागरिक अवलंबून आहेत. या नागरिकांनी आपल्या पासपोर्टवरील संपूर्ण माहिती भारतीय दुतावासाच्या कार्यालयात मोबाईल फोनद्वारे पाठविली आहे. या परिस्थितीमुळे भारतीय नागरिक भयभीत झाले असून लवकरात लवकर मायेदशी परतण्याची इच्छा असल्याचे यापैकी एका कामगाराने सांगितले.