आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीकडे एकटक पाहणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. पत्नीकडे एकटक पाहिल्याने व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. महिलेच्या सध्याच्या पतीला त्याचं एकटक पाहणं अजिबात आवडलं नाही आणि त्याने हा अपमान समजत बेदम मारहाण केली. यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

२९ वर्षीय हरेश लालवानी रिक्षाचालक असून वडज येथील सोहराबजी कंपाऊंडमधील रहिवासी आहे. हरेश ललवानी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आपल्या पहिल्या पत्नीच्या पतीने मारहाण केली असल्याचं म्हटलं आहे. एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, हरेश आणि मनिषा यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. गतवर्षी त्यांनी घटस्फोट घेतला होता.

‘शनिवारी रात्री मी माझ्या घरासमोर गरबा खेळत होतो. यावेळी माझी पहिली पत्नी मनिषादेखील तिथे गरबा खेळत होती. मी तिच्याकडे पाहत असताना तिचा सध्याचा पती अशोक दुर्गैश तेजवानी याला राग आला आणि त्याने विनाकारण मला मारहाण करण्यास सुरुवात केली’ अशी माहिती हरेशने दिली आहे.

अशोक याने हरेशच्या डोक्यावर काठी मारली ज्यानंतर तो रक्तबंबाळ झाला. हरेशच्या कुटुंबाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत हरेशची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही अशोक हरेशला मारहाण करत होता. मारहाणीत हरेशचे तीन कुटुंबीयही जखमी झाले आहेत.

अशोक तेजवानीच्या वडिलांनी हरेश आणि त्यांच्या कुटुंबीयांना घर सोडून जाण्याची धमकी दिली आहे. अन्यथा वाईट परिणाम होतील असं धमकावण्यात आलं आहे. यानंतर हरेश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.