मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कौटुंबिक न्यायालयातील सल्लागारासमोर एक अजब प्रकरण आलं आहे. येथील एक दापंत्य मद्यसेवनामुळे त्रस्त आहे. एकीकडे अनेक स्त्रिया आपल्या पतीच्या मद्यसेवनाला त्रस्त असण्याच्या तक्रारी येत असताना हे प्रकरण अगदी उलट आहे. आपल्या पत्नीने मद्यसेवन करावं अशी मागणी पती या प्रकरणात करत आहे. कौटुंबिक कार्यक्रमात जेव्हा इतर लोक मद्यसेवन करत असतात किमान तिथे तरी तिने मद्यसेवन करावं असं त्याचं म्हणणं आहे.

सल्लागार शैल अवस्थी यांनी सांगितलं आहे की, ‘हे एकदम अजब प्रकरण आहे. पहिल्यांदाच अशा पद्दतीचं प्रकरण माझ्यासमोर आलं आहे. हे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. त्यांच्याकडे जास्त संपत्तीदेखील नाही. पती एका खासगी कंपनीत कामाला आहे. पतीच्या संपूर्ण कुटुंबाला यामध्ये आई, वडील, भाऊ, बहिण सर्वांनाच मद्यसेवन करायला आवडतं. फक्त पत्नी मद्यसेवन करत नाही’.

सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. पण नंतर सासरच्यांनी पत्नीवर दारु पिण्यासाठी आणि सोबत देण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिने नकार दिला आणि तिथेच वादाला सुरुवात झाली. हे काही नवदांपत्य नव्हतं असंही शैल अवस्थी यांनी सांगितलं आहे. त्यांना तीन मुलं आहेत. लग्नानंतरच त्यांच्यात वाद सुरु झाला होता. पण आता वादाने टोक गाठलं असल्याने त्यांनी सल्लागाराची मदत मागितली आहे.

‘वाद झाल्यानंतर पत्नी अनेकदा आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून जात असे. तिच्या कुटुंबात कोणीही मद्यसेवन करत नसल्याने तिनेही नकार दिला होता. पण हा आपल्या पतीच्या कुटुंबाच्या परंपरेचा भाग असल्याचं वाटत असल्याने तिने पतीला कधीही दारु सोडण्याचा आग्रह केला नाही. पत्नी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सॉफ्ट ड्रिंक किंवा ज्यूस पित असे. पण यामुळे सासरचे लोक नाराज झाले होते. लग्नाच्या एका वर्षानंतर यावरुन मोठे वाद होण्यास सुरुवात झाली. सासूनेही दारु पिण्यास जबरदस्ती केल्याने महिला नाराज झाली होती’, अशी माहिती शैल अवस्थी यांनी दिली. दरम्यान शैल अवस्थी यांनी पती आणि त्याच्या कुटुंबाला पत्नीवर दारु पिण्यासाठी जबरदस्ती केला जाऊ नये असा सल्ला दिला आहे.