नऊ हजार कोटींच्या बदल्यात जगभरातली माझी १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली. तसेच मी ब्रिटनचा नागरिक असून सध्या तिथंच राहतो आहे, मग तरीही मला फरार आरोपी कसे म्हणता? असा सवाल मद्यसम्राट विजय मल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. मोदींच्या एका मुलाखतीचा दाखला देताना त्यांने सरकारवर केवळ बोलघेवडेपणाचा आरोप केला आहे.

मल्ल्या ट्विटमध्ये म्हणतो, मोदींनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलंय की, त्यांच्या सरकारने माझ्यावरील ९ हजार कोटींच्या कर्जाच्या बदल्यात १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे, मग आता मी आरोपी कसा? तसेच मी १९९२पासून ब्रिटनचा रहिवासी असून सध्या तिथचं आहे मग मी फरार कसा?.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत मल्ल्याचा उल्लेख करीत म्हटले होते की, देशातून नीरव मोदी आणि विजय मल्या यासाठी पळून गेले कारण, सरकारने कठोर कायदे बनवले होते. आम्ही मल्याची कर्जापेक्षा अधिक संपत्ती जप्त केली आहे. मल्याचे कर्ज ९ हजार कोटींचे होते मात्र आम्ही जगभरातील त्याची १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वीही लोक घोटाळे करुन देशातून पळून जात होते, मात्र त्यावेळचे सरकार त्यांची नावेही जाहीर करीत नव्हते. आम्ही तर त्यांच्याविरोधात कारवाई सुरु केली त्यामुळे त्यांना पळून जावे लागले. मल्ल्याने मोदींच्या याच विधानावर आक्षेप घेतला आहे.

मल्याने म्हटले की, भारतात माझी प्रतिमा एका पोस्टर बॉयप्रमाणे बनवण्यात आली आहे. याला स्वतः पंतप्रधानांनीच पुष्टी दिली आहे. मी नुकतीच मोदींची मुलाखत पाहिली, यामध्ये मोदी माझे नाव घेऊन म्हणताहेत की, माझ्यावर ९ हजार कोटींचे कर्ज आहे, मात्र सरकाने माझी १४ हजार कोटींची संपत्ती जप्त केली आहे. म्हणजे हे सिद्ध होते की, मी जेवढे कर्ज घेतले आहे त्याची परतफेड झाली आहे. त्यामुळे परतफेड झाल्यानंतरही भाजपाचे प्रवक्ते आपले भाषण ठोकताना मला आरोपी म्हटले जाते. तसेच दुसऱ्या ट्वीटमध्ये त्याने म्हटले की, मी १९९२ पासून ब्रिटनचा नागरिक आहे. मात्र, तरीही या सत्याकडे दुर्लक्ष करीत मला फरार घोषित करण्यात येत आहे.

ब्रिटनमधून विजय मल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास पथके सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.