काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र यावेळी त्यांना केंद्रीय अर्थसंकल्पवर बोलणं टाळलं. यावरून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

” अर्थसंकल्पाच्या संपूर्ण कालावधीत सभागृहात उपस्थित नव्हते व त्यांना सभागृहात थांबायची सवय देखील नाही. काही लोकं संसदेतही कमी काळ असतात आणि देशातही, ज्याचा परिणाम समोर आला आहे.” असा टोला अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

”एक वरिष्ठ खासदार माझ्या अगोदर बोलत होते, म्हणून मला वाटले की त्यांना या सभागृहाचे नियम माहीत असले पाहिजेत आणि जर एखाद्या विषयावर आधीच चर्चा झाली असेल, तर त्यावर पुन्हा चर्चा केली जात नाही. दुसरे म्हणजे, मी समजू शकतो की ते अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी तयार नव्हते. असं अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

तसेच, राहुल गांधी यांनी आज संसदेत भाजपाला उद्देशून हम दो हमारे दो.. च्या घोषणेवरून देखील अनुराग ठाकूर यांनी त्यांच्यावर टीका केली. ”मी राहुल गांधी यांना विचारू इच्छितो की ज्या दोन उद्योजक घराण्यांबद्दल ते बोलत आहेत, त्यांना केरळमध्ये जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा बंदर का दिलं गेलं? ते तुमचेच आहेत.”

अर्थसंकल्पावर बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, या अर्थसंकल्पात आशेचा किरण दिसतो व यामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याबरोबरच नव्या भारताच्या निर्माणावर जोर दिला गेला आहे.

तर, हा देश फक्त चार लोक चालवत असल्याचं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत भाषण केल्यानंतर आज(गुरुवार) राहुल गांधी लोकसभेत आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. बाजार समित्या बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशाचा कणा मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. यावेळी भाजपा खासदारांनी मोठ्या प्रमाणात सभागृहात गदारोळ घातला.