विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, अशा चर्चा सुरू होत्या. आघाडीच्या काही नावांमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, नितीन पटेल आणि इतर नेत्यांपैकी बाजी मारली ती भूपेंद्र पटेल यांनी. भूपेंद्र पटेल आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, आपल्याला डावलून भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केल्यामुळे नितीन पटेल नाराज असल्याची चर्चा होती. यावर नितीन पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी लोकांच्या मनात राहतो, त्यामुळे मला तिथून कोणीच काढू शकत नाही,” असं ते म्हणाले आहेत

“मुख्यमंत्रीपदासाठी केवळ मी एकटाच इच्छूक नव्हतो, तर माझ्यासारखे अनेकजण होते. भूपेंद्र पटेल यांच्या निवडीमुळे मी नाराज नाही. या केवळ अफवा आहेत. कोणताही निर्णय हा एका व्यक्तीचा नाही तर पक्षाचा असतो. तसेच रविवारी मी भाजपचे गुजरात प्रभारी भूपेंद्र यादव यांची परवानगी घेतल्यानंतरच पक्ष कार्यालय सोडले होते,” असंही ते म्हणाले. नितीन पटेल यांनी रविवारी संध्याकाळी मेहसाणा शहरातील एका कार्यक्रमात लोकांना संबोधित केलं.

“जोपर्यंत मी माझ्या लोकांच्या, मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात आहे तोपर्यंत मला कोणीही बाहेर फेकू शकत नाही. मी अस्वस्थ नाही. मी १८ वर्षाचा होतो तेव्हापासून भाजपमध्ये काम करत आहे आणि काम करत राहीन. मला पक्षात पद मिळो अथवा न मिळो  मी पक्षात असेपर्यंत सेवा करत राहीन. मला लोक काय म्हणतात याची चिंता नाही. भूपेंद्र भाई आमचेच आहेत. त्यांनी मला आमदार म्हणून त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केले. ते माझे मित्र आहेत. लोक काय बोलतात किंवा काय विचार करतात याची मला पर्वा नाही. तुमच्यामुळे माझ्या अस्तित्वाला धोका नाही,” असं ते उपस्थित जनतेला म्हणाले.