अयोध्येत येत्या पाच ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्यावेळी भाजपा नेत्या उमा भारती अयोध्येमध्ये असतील. पण त्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. स्वत: उमा भारती यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे उमा भारती यांना निमंत्रण देण्यात आले आहे. करोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अन्य व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे असे उमा भारती म्हणाल्या.

आणखी वाचा- अयोध्या रेल्वे स्टेशनचाही चेहरामोहरा बदलणार; मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणं होणार पुनर्बांधणी

“अमित शाह आणि अन्य भाजपा नेत्यांना करोनाची लागण झाल्याचे ऐकल्यापासून मला अयोध्येत भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची चिंता सतावत आहे. खासकरुन पंतप्रधान मोदींची” असे उमा भारती यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- ड्रोन, शहरात प्रवेशबंदी, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई; अयोध्येत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

“राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजानाचा कार्यक्रम होईल, त्यावेळी मी शरयू नदी किनारी थांबणार असल्याचे राम जन्मभूमी न्यासाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे” असेही पुढे उमा भारती यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

“अयोध्येसाठी मी आज भोपाळहून रवाना होईन. अयोध्येत जाईपर्यंत मी करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि शेकडो लोक ज्या ठिकाणी उपस्थित असतील तिथून मी दूर राहणार आहे. पंतप्रधान मोदी आणि सर्वजण तिथून निघून गेल्यानंतर मी रामललाचे दर्शन घेण्यासाठी तिथे जाईन” असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- “राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी दिलंय योगदान”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर

आणखी वाचा- १५० पेक्षा जास्त नद्या आणि तीन समुद्रांचे पाणी घेऊन अयोध्येत पोहोचले ‘ते’ दोन भाऊ

भूमिपूजन कार्यक्रमातून आपले नाव काढण्यात यावे, असे उमा भारती यांनी राम जन्मभूमी न्यासाच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे. ९० च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनात लालकृष्ण आडवाणींसोबत उमा भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी या आंदोलनात उमा भारती आघाडीवर होत्या. “माझ्या हयातीत आज राम मंदिर निर्माणाचे काम चालू होत आहे ही अभिमानाची बाब आहे” असे उमा भारती म्हणाल्या.