राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने मी पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होईन असा आशावाद माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे. मला दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी विरोधकांनी हातमिळवणी केली. सध्याच्या राजकारणात जातीचा आणि पैशाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो असे सिद्धरामय्या म्हणाले.

लोक मला पुन्हा एकदा आशिर्वाद देऊन राज्याचा मुख्यमंत्री बनवतील असे मला वाटले होते. पण मी दुर्देवाने हरलो. पराभवानंतर सर्व काही संपलेले नाही. राजकारणात जय-पराजय सुरु असतो. मी पुन्हा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईन असे सिद्धरामय्या म्हणाले. ते हसन येथे एका मेळाव्याला संबोधित करत होते.

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार आहे. कर्नाटक विधानसभेत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष आहे. पण त्यांना निर्णायक बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. काँग्रेसच्या तुलनेत जेडीएसकडे निम्मे आमदार आहेत. पण तरीही एच.डी.कुमारस्वामी कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत. फक्त भाजपाला आणखी एका राज्यात सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अशा प्रकारची आघाडी केली आहे. काँग्रेस आणि जेडीएसमध्ये सर्वकाही आलबेल नसून सरकारमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद आहेत.