दोषींना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत माझा लढा संपणार नाही तो सुरुच राहणार अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा पुढील शिक्षा होईपर्यंत लांबणीवर गेली आहे. त्यानंतर निर्भयाच्या आईने ही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे.
१ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासंबंधीचे डेथ वॉरंट काढण्यात आले होते. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाने स्पष्टही केले होते. मात्र फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तिहार तुरुंग प्रशासनाच्या वतीने इरफान अहमद पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले.
निर्भया प्रकरणातील चारपैकी विनय शर्माची याचिका प्रलंबित आहे. इतर तिघांना फाशी दिली जाऊ शकते. विनय शर्माच्या प्रकरणाचा अपवाद वगळता इतर कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. या याचिकेवर सुनावणी सुरु असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. ज्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच पुढील आदेशांपर्यंत दोषींना फाशी देण्यात येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.
मात्र कोर्टाने दिलेल्या या निर्णयानंतर निर्भयाच्या आईला प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी आत्तापर्यंत मी माझा लढा देत आले आहे तो लढा देतच राहणार. जोवर निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत मी माझा लढा सुरुच ठेवणार आहे असं निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.
“आरोपींचे वकील ए.पी. सिंग हे मला आव्हान देऊन गेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे ही फाशी मी अनंत काळासाठी स्थगित करुन दाखवेन. मात्र केंद्र सरकार, दिल्ली सरकार, न्यायालय या सगळ्यांना सांगणं आहे की जोपर्यंत चार जणांना फाशी होईपर्यंत मी गप्प बसणार नाही. आज जो निर्णय कोर्टाने दिला आहे त्याने पु्न्हा एकदा आम्हाला या सगळ्या आरोपींपुढे झुकावं लागल्याची भावना आहे. आरोपींचे वकील सरळ सांगून गेले आहेत की या दोषींना फाशी होणार नाही. आणखी किती काळ आम्हाला न्यायासाठी वाट बघावी लागणार आहे?” असा प्रश्नही निर्भयाच्या आईने विचारला आहे.
काय आहे निर्भया प्रकरण?
१६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रूर पद्धतीने लैंगिक छळही करण्यात आला. या अत्याचारामुळे निर्भयाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या जखमांशी झुंज देत उपचार घेत असताना निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती