IAF Air Strike In Pakistan : भारताकडून नियत्रंण रेषेपार (एलओसी) जाऊन दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर भारतीय वायूसेना अलर्ट मोडवर आली आहे. भारतीय वायूसेनेने आंतरराष्ट्रीय सीमा, एलओसीशी निगडीत संरक्षण तंत्रज्ञान अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानने कोणतीही प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायूसेना सज्ज झाली आहे.

दुसरीकडे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने एलओसी पार करून केलेल्या कामगिरीचे विरोधी पक्षांनी स्वागत केले आहे. भारतीय वायूसेनेच्या कामगिरीला सलाम करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वायूसेनेच्या कामगिरीला सलाम केला आहे.

भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकले. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.