पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात जोरादार आंदोलन सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांनी मंगळवारी नागरिकांना उद्देशुन एक मोठं वक्तव्यं केलं आहे, जर कोणी तुमचे अधिकार हिसकवण्यासाठी आलं तर त्यांना माझ्या मृतदेहावरून जावं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. दक्षिण २४ परगनामधील एका रॅली दरम्यान त्या बोलत होत्या.

जर तुमच्याकडे कोणी आलं व तुमची माहिती विचारली, तर त्यांना ती देऊ नका. सीएए, एनपीआर, एनआरसी या ठिकाणी अंमलबजावणी होणार नाही. जर कोणी तुमचा अधिकार हिसकावण्यासाठी येत असेल तर त्याला माझ्या मृतदेहावरून जावे लागेल. असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

सीएए व एनआरसीविरोधात सुरू असलेले आंदोलन जोपर्यंत आवश्यकता आहे, तोपर्यंत सुरूच राहील. राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी सर्वकाही करू, असं देखील बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं. तसेच, आम्ही कोणाच्या दयेवर जगत नाही, मी कोणालाही आपले अधिकार हिसकावू देणार नाही, मी तुमची रक्षक आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, तुम्ही नेहमी आपल्या देशाची तुलना पाकिस्तानशी का करतात? तुम्हाला केवळ भारताबाबतच बोलले पाहिजे. आम्ही पाकिस्तान बनू इच्छित नाही. आम्ही भारतावर प्रेम करतो, मात्र ते दिवसभर पाकिस्तानबाबतच बोलतात जणूकाही ते पाकिस्तानचे राजदूत आहेत. पाकिस्तानची चर्चा पाकिस्तानने करावी, आम्ही भारताची चर्चा करणार, ही आमची जन्मभूमी आहे. आता इतक्या वर्षानंतर पुन्हा आम्हाला आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागेल, देशाचे गृहमंत्री म्हणतात की हो, देशात एनआरसी असेल आणि पंतप्रधान म्हणतात की त्यांना याची माहिती नाही, असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.