गतवर्षात मोदी सरकारला वेगवेगळया आव्हानांना सामोरं जावं लागलं. वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन झालेलं मोठं आंदोलन, त्यानंतर कोविड-१९ मुळे झालेली अर्थव्यवस्थेची हानी, पूर्व लडाख सीमेवर चीनच्या घुसखोरीमुळे निर्माण झालेली युद्धाची स्थिती आणि वर्षाच्या शेवटी कृषी कायद्यावरुन दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन.

खरंतर एकापाठोपाठ एक उभ्या राहिलेल्या संकटांच्या या मालिकेमुळे कुठलेही सरकार असो किंवा नेता त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख घसरला पाहिजे. पण मोदी सरकार याला अपवाद ठरले आहे. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असून जनतेने त्यांच्या सरकारच्या कामगिरीला पसंतीची पावती दिली आहे. इंडिया टुडे-कार्वी इनसाइट्स मूड ऑफ द नेशन (MOTN) च्या सर्वेमधून हे समोर आले आहे.

आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सहज बहुमत मिळवेल. MOTN सर्वेनुसार, एनडीएला ३२१ जागांवर विजय मिळू शकतो. ऑगस्ट २०२० मध्ये केलेल्या MOTN सर्वेच्या तुलनेत आता आणखी पाच जागा वाढू शकतात.

२०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा अजूनही कमीच आहे. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३५७ जागांवर विजय मिळवला होता. दुसऱ्याबाजूला काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या जागांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. यूपीएला ९३ जागांवर समाधान मानावे लागेल. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास, आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास एनडीएला ४३ टक्के मते मिळतील. २०१९ लोकसभा निवडणुकीत ४५ टक्के मते मिळाली होती.