जीएसटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस भाजप सरकारला पदोपदी कोंडित पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. राहुल गांधींनी जीएसटीला ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे संबोधून मोठी संभावना केली होती. मात्र, या प्रकरणी काँग्रेस दुटप्पी भुमिका घेत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. काँग्रेसला यावर आक्षेप होताच तर त्यांनी संसदेत जीएसटी विधेयकाला पाठींबा कसा दिला?असा सवाल राजनाथ यांनी केला आहे. गुजरातमधील चौरासी येथे निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते.


राजनाथ म्हणाले, ‘मला काँग्रेसच्या तरुण नेत्याला विचारावे वाटते की, जर जीएसटी गब्बर सिंग टॅक्स होता तर तुम्ही त्याला संसदेत पाठींबा का दिला?’ काँग्रेस गुजरातमध्ये जातीय राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आजवर काँग्रेसने जातीचेच राजकारण केले असून याच आधारे ते आता गुजरातचेही विभाजन करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.


अशा प्रकारे जातीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्या तीन तरुण नेत्यांबाबत आपल्याला म्हणूनच सहानुभूती वाटते असे राजनाथ यावेळी म्हणाले.