राष्ट्रपती सांगत नाहीत तोपर्यंत मी माझा पगार देणार नाही असं म्हणत भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांना पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपा आणि एनडीएचे खासदार संसदेत कामकाज न झालेल्या २३ दिवसांचं वेतन आणि भत्ते परत करणार आहेत. या २३ दिवसांमध्ये संसदेचं कामकाज अजिबात न झाल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी दिली होती. मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रपती सांगत नाहीत, तोपर्यंत मी माझा पगार घेणार नाही असं कसं म्हणू शकतो असं म्हणत पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

‘मी रोज संसदेत जात होतो, पण जर कामकाज सुरळीत पार पडत नसेल तर त्यात माझी काय चूक. मी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी आहे, जोपर्यंत ते सांगत नाहीत तोपर्यंत मी माझा पगार घेणार नाही असं कसं म्हणू शकतो’, असं सुब्रमण्यम स्वामी बोलले आहेत.

अनंतकुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं की, ‘भाजपा-एनडीएच्या खासदारांनी संसदेत कामकाज न झालेल्या २३ दिवसांचे भत्ते आणि वेतन परत करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पैसा लोकांची सेवा करण्यासाठी मिळत असून जर आम्ही ते करण्यात असक्षम असू तर हा पैसा घेण्याचा आम्हाला अधिकार नाही’. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या राजकारणामुळे राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज होऊ शकले नसल्याचा आरोप केला. आम्ही सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत मात्र ते कामकाज होऊ देत नाहीयेत असं त्यांनी म्हटलं.

२९ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशन संपत आलं आहे. मात्र या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर सभागृह ठप्प झाल्याने काम सुरळीत होऊ शकलेलं नाही.