19 January 2021

News Flash

“ते डोवाल आहेत हे माहित असतं तर खेचून नेलं असतं तरी गेलो नसतो”

"तो व्हिडिओ समोर आल्यापासून घराबाहेर निघणं देखील कठीण झालंय"

(सात ऑगस्ट रोजी जारी झालेल्या व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखबाबत ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ते जम्मू-काश्मीरच्या शोपियां येथे रस्त्यावर काही स्थानिकांशी चर्चा करताना आणि त्यांच्यासोबत जेवण करताना दिसले होते. त्या व्हिडिओद्वारे जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असून तेथील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आणि शांतता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होता.

मात्र, व्हिडिओ क्लिपमध्ये डोवाल यांच्यासोबत चर्चा करणाऱ्या एका व्यक्तीने, ज्यांच्याशी चर्चा केली ते एनएसए अजित डोवाल होते याबाबत माहितीच नव्हती असं म्हटलंय. “जॅकेट घातलेली ती व्यक्ती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांचे खासगी सहाय्यक असल्याचं मला वाटलं होतं. तो व्हिडिओ समोर आल्यापासून स्थानिकांच्या प्रतिक्रियांचा परिणाम स्वतःवर आणि कुटुंबीयांच्या जीवनावर झाला आहे”, असं या व्यक्तीने म्हटलंय.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 62 वर्षांचे सामाजिक कार्यकर्ता आणि निवृत्त फॉरेस्ट रेंज ऑफिसर मंसूर अहमद मागरे म्हणाले की, “जेव्हा मी त्यांच्याशी(डोवाल) बोलत होतो, त्यावेळी डीजीपी आणि एसपी साहेब हाताची घडी घालून नम्रपणे उभे होते. त्यामुळे ही व्यक्ती खासगी सहाय्यक नसेल याची मला खात्री पटली. म्हणून मी त्यांना त्यांची ओळख विचारली. त्यावर मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं. मी घरी परतल्यावर माझा मुलगा झोपला होता. त्याला उठवून मी कोणातरी डोवाल नावाच्या व्यक्तीला भेटल्याचं त्याला सांगितलं. तेव्हा तो हैराण झाला आणि आता तुम्ही लवकरच टीव्हीवर दिसाल असं तो म्हणाला. त्या व्हिडिओमुळे माझं जीवन पूर्णतः बदललं, लोकं मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखत होते पण आता सगळी प्रतिमा बदललीये. माझी भेट डोवाल यांच्याशी होणार आहे याबाबत मला जर आधी कल्पना असती तर मला खेचून घेऊन गेले असते तरी मी गेलो नसतो”, असं मागरे म्हणाले. शोपियां येथील अलियापूरा परिसरात राहणारे मंसूर अहमद मागरे हे एका सीनियर सिटिझन्स फोरमचे राज्य समन्वयक आहेत, तसंच एका स्थानिक मशिदीच्या कमिटीचेही ते प्रमुख आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांच्या कुटुंबीयांच्या वतीने पोलीस आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते नेहमी चर्चा करत असतात. “7 ऑगस्ट रोजी दुपारी नमाज पठणासाठी जात असताना पोलिसांना पाहिलं. त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान देखील होते. तुम्हाला डीजीपी सोबत भेटायचंय असं त्यांनी मला सांगितलं आणि बाइकवर घेऊन मला पोलीस स्थानकात घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर 5-6 जण आधीच उपस्थित होते. त्यातील एक ड्रायव्हर होता, तर दुसऱ्याचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात होता. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही कोणी चर्चेसाठी आलं नाही, त्यामुळे मला देखील अटक करण्यासाठी आणल्याचं वाटलं. म्हणून मी त्यांना ज्या कोठडीत मला डांबणार आहात ती दाखवा असं म्हणालो. त्यावर असं काहीही नाहीये हे उत्तर मला मिळालं. थोड्यावेळात आम्हाला रुग्णवाहिकेतून एका बस स्टँडवर नेण्यात आलं. तेथे पोहोचल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लष्कराच्या गाड्यांची रांग होती. पाच-सहा कॅमेरामन देखील होते. रुग्णवाहिकेतून उतरताच समोर शोपियांचे एसपी संदीप चौधरी आणि डीजीपी सिंह हे होते. त्यानंतर जॅकेट घातलेली एक व्यक्ती समोर आली , त्यावेळी ते डीजीपी साहेबांचे खासगी सहाय्यक असावेत असं मला वाटलं. त्यांच्यासोबत 10-15 मिनिटांच्या चर्चेनंतर आम्हाला त्यांनी (डोवाल) एकत्र जेवणासाठी सांगितलं. तेवढ्यात कोणीतरी माझ्या हातात जेवणाची थाळी दिली. माझ्या मुलाने सांगितल्यानंतर मला त्या व्हिडिओचं आणि भेटीचं गांभीर्य लक्षात आलं. माझी भेट डोवाल यांच्याशी होणार आहे याबाबत मला जर आधी कल्पना असती तर मला खेचून घेऊन गेले असते तरी मी गेलो नसतो. तो व्हिडिओ म्हणजे काश्मीरमधून आलेलं पहिलं वृत्त होतं, त्यानंतर आमचं जीवन बदललंय…तुमच्या कृतीमुळे आम्ही बदनाम होतोय असा आरोप नातेवाईकांकडून सातत्याने केला जातोय”.

दुसरीकडे, मंसूर मागरे यांचे कुटुंबीय स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियेमुळे खूपच निराश आहेत. विशेषतः काँग्रेसचे नेता गुलाम नबी आझाद यांच्या ‘आजकाल पैसे देऊन कोणालाही खरेदी करता येतं’ या विधानामुळे ते दुःखी आहेत. याबाबत बोलताना मंसूर मागरे यांचा मुलगा मोहसिन मंसूर म्हणाला की, “आम्ही पैसै घेतल्याचं त्यांनी (आझाद) म्हटलंय, आता स्थानिक देखील असंच म्हणायला लागलेत. त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहोत”. व्हिडिओ समोर आल्यापासून घराबाहेर निघणं देखील कठीण झालंय, असंही मोहसिन मंसूर याने म्हटलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2019 12:58 pm

Web Title: if i had known that i was to meet doval i would not have gone even if they had dragged me along says kashmir resident sas 89
Next Stories
1 Man Vs Wild: १८ वर्षात पहिल्यांदा सुट्टी घेतली-पंतप्रधान नरेंद्र मोदी
2 काश्मीरमध्ये तैनात जवानांना कुटुंबीयांची चिंता, त्यांनाही बसतोय फोन बंदीचा फटका
3 ‘तुमचं तुम्ही बघून घ्या’, काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीस अमेरिकेचा नकार
Just Now!
X