टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी भारताला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या Zakir Naik प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केली तर त्याला सोपवण्यात येईल, असे मलेशिया सरकारने म्हटले आहे. भारतात नाईकवर टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले आहे.

मलेशियामधील वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारकडून जर झाकिर नाईकच्या प्रत्यार्पणाची विनंती आली तर त्याला भारताकडे सोपवण्यात येईल, असे मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद जाहिद हमीदींनी कनिष्ठ सभागृहात सांगितले. भारत सरकारकडून अद्याप अशी मागणी आली नसल्याचेही ते म्हणाले. नाईकने मलेशियातील कोणताही कायदा अजून तोडलेला नाही. त्यामुळे त्याचे पासपोर्ट रद्द करता येणार नाही, असेही त्यांनी या वेळी म्हटले. याप्रकरणी मलेशिया सरकारला पत्र पाठवल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.

एनआयएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच विदेश मंत्रालयाच्या माध्यमातून मलेशिया सरकारला नाईकच्या प्रत्यर्पणासाठी औपचारिक मागणी केली जाईल. आपल्या प्रशोभक प्रवचनाने मुस्लिम युवकांना दहशतवादाकडे खेचल्याचा ५२ वर्षीय झाकीर नाईकवर आरोप आहे. याच आरोपामुळे नाईकची स्वंयसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली आहे. ढाका येथील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांनी नाईकच्या प्रवचनामुळे प्रेरित झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर अटकेच्या भीतीने नाईकने भारत सोडून पलायन केले होते.