News Flash

…तर आम्ही मोदींच्या चरणी लोटांगण घालू- केजरीवाल

पंजाबमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांची रॅली

पंजाबमधील सभेत भाषण करताना अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंजाबमध्ये आहेत. यावेळी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित करताना केजरीवाल वेगळ्याच मूडमध्ये दिसले. पंजाबमधील सभेदरम्यान केजरीवालांनी मोदीविरोधी भाषेचा अतिशय कमी वापर केला. याउलट केजरीवालांनी चक्क मोदींच्या चरणी लोटांगण घालू, अशी भाषा सभेमध्ये वापरली. ‘आम आदमी पक्षाला निवडणुकीत विजय मिळाल्यास आम्ही पंजाबाच्या हिताची काळजी घेऊ. गरज पडल्यास आम्ही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाजवळ लोळण घेऊ,’ असे केजरीवाल यांनी सभेत म्हटले.

‘पंजाबच्या हिताची कामे व्हावीत म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु. पंजाबच्या प्रगती आणि विकासाच्या कामांसाठी आम्ही मोदींच्या चरणी लोटांगण घालू. इतके करुनही काहीच न झाल्यास आम्ही संघर्ष करु आणि साड्डा हक, एत्थे रख असे म्हणू,’ अशा शब्दांमध्ये केजरीवालांनी पंजाबमधील सभेला संबोधित केले. केजरीवालांच्या या भाषणानंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘दिल्लीतील प्रत्येक कामात केंद्राकडून अडथळे आणले जातात. मात्र तरीही आम्ही दिलेली आश्वासने पाळली आहेत. मात्र पंजाबसोबत असे होणार नाही. कारण या राज्याची स्वत:ची ताकद आहे. पंजाबच्या हितांसांठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर झुकण्यास तयार आहे. मात्र दिल्लीत ते आम्हाला खूप त्रास देतात, यामध्ये तिळमात्रही शंका नाही,’ असे केजरीवाल यांनी म्हटले.

‘काँग्रेस आणि शिरोमणी दल म्हणतात की ते (केजरीवाल) मोदींविरोधात लढतात म्हणून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय होईल’, असे म्हणत केजरीवालांनी सत्ताधारी बादल कुटुंबावर जोरदार टीका केली. ‘मागील दोन वर्षांमध्ये पंतप्रधानांचे खूप कौतुक केले आहे. मात्र तरीही संपूर्ण राज्याला अभिमान वाटेल असे ते काहीही करु शकलेले नाहीत. त्यामुळे बादल यांनी केलेल्या कौतुकाचा काहीही उपयोग झालेला नाही,’ असे म्हणत केजरीवालांनी बादल कुटुंबावर निशाणा साधला. काँग्रेस आणि अकाली दलावर एकत्र टीका करण्याची संधीदेखील केजरीवालांनी सोडली नाही. ‘बादल परिवार आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांची हातमिळवणी झालेली नाही. अकाली दल आणि काँग्रेसमध्ये पती-पत्नीचे नाते आहे,’ असा टोला केजरीवालांनी लगावला.

‘बादल परिवार आणि अमरिंदर सिंग यांच्यात गुप्त समझोता झाला आहे. बादल आणि अमरिंदर सिंह एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या अनेक फलकांसाठी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी आर्थिक मदत केली आहे. अमरिंदर सिंह आणि प्रकाश सिंग बादल चांगले मित्र आहेत. त्यामुळेच प्रकाश सिंग बादल यांच्याविरोधातील सर्व पोलीस केसेस हटवण्यात आल्या आहेत. कॅप्टन अमरिंदर यांनी याची परतफेड म्हणून मजेठिया यांच्या सीबीआय चौकशीचा विरोध केला आहे,’ अशा आरोपांच्या फैरी केजरीवाल यांनी झाडल्या. ‘बादल अमरिंदर यांच्याविरोधातील तक्रारी मागे घेत असताना मजेठिया माझ्या विरोधात मानहानीचा खटला लढत आहेत, कारण मी त्यांना अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारा म्हटले होते,’ असेही केजरीवाल यांनी पुढे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 8:40 pm

Web Title: if needed we can even lie down in feet of pm modi for punjab arvind kejriwal
Next Stories
1 नोटाबंदीने लोकांना होणाऱ्या त्रासामुळे रतन टाटा चिंतेत
2 ५००, १००० च्या जुन्या नोटा उद्यापासून बदलता येणार नाहीत; केंद्राचा निर्णय
3 नोटाबंदीमुळे टळला तरुणीचा सौदा
Just Now!
X