उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरण आता प्रचंड तापले आहे. विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले आहेत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

आणखी वाचा- “मला कोणीच अडवू शकत नाही”, राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार

दरम्यान, हाथरसकडे रवाना होताना माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, जर यावेळी नाही, तर ते आम्ही पुन्हा प्रयत्न करू. मागील वेळी उत्तर प्रदेश सरकारने यमुना एक्स्प्रेस वे वरच त्यांना रोखले होते.

आणखी वाचा- हाथरस : पीडितेची आई म्हणाली,”अधिकारी म्हणत होते खात्यात किती पैसे आले माहित आहे का?”

प्रियंका गांधी स्वतः कार चालवत असून, त्यांच्या गाडीत राहुल गांधी बसलेले आहेत. त्यांच्या गाडीच्या मागे वाहनांचा भला मोठा ताफा आहे. राहुल व प्रियंका गांधी हे हथरसकडे रवाना होताच, उत्तर प्रदेश पोलिसांनी  मोठ्याप्रमाणावर फौजफाटा वाढवला आहे. तर, विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत, रस्त्यांवर उतरल्याचे दिसून येत आहे. यमूना एक्स्प्रेस वे वर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसत आहे.

आणखी वाचा- हाथरस पीडितेच्या गावात ३०० पोलिसांची फौज, दोन दिवस कुटुंबाला केलं ‘कैद’; फोन टॅपिंगचा संशय

या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत हाथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली होती. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुःखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.