News Flash

पेट्रोलने शंभरी गाठल्यास पंप होणार ठप्प

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आता रोजचीच झाली आहे. सध्या नव्वदीत असणारे पेट्रोल ऐन दिवाळीतच शंभरी पार करू शकतं असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत.

पेट्रोल- डिझेल

पेट्रोल-डिझेलची दरवाढ आता रोजचीच झाली आहे. सध्या नव्वदीत असणारे पेट्रोल ऐन दिवाळीतच शंभरी पार करू शकतं असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत. पण जर पेट्रोलने शंभरी पार केल्यास पंप ठप्प होणार आहेत. होय, कारण जर पेट्रोल शंभरी पार झाले तर पेट्रोलियम इंडस्ट्रीला Y2K या समस्येला सामोरं जावे लागणार आहे. जर पेट्रोल १०० रुपये लिटर झाल्यास पंपावर लावलेले डिस्पेंसिंग युनिट (पेट्रोल-डिझेलची किंमत दाखवणारे मीटर) काम करणे बंद करणार आहे.

सध्या पेट्रोल पंपावर असणारे डिस्पेंसिंग युनिट रूपयाचे दोन अंक आणि पैशाच्या दोन अंकामध्ये सेट करण्यात आले आहे. देशातील अनेक पेट्रोल पंपांवरील मशिन्समध्ये प्रतिलिटर दर तीन आकड्यांच्यावर दाखवण्याची सोय उपलब्ध नाहीये. प्रिमियम पेट्रोलच्या दरांनी आत्ताच तीन आकड्यांचा दर गाठला असल्याने प्रमुख शहरांमधील पेट्रोल पंपांवरील मशिनमध्ये ही अडचण येत असल्याचे पेट्रोल पंप मालकांचे म्हणणे आहे. पेट्रोल पंपावरील मशिन्स अपडेट केल्याशिवाय पेट्रोलचे दर प्रतिलिटर शंभरहून अधिक ठेवल्यास ग्राहकांना केवळ दोनच आकडे दिसतील. म्हणजेच पेट्रोलची किंमत १०१ रुपये असल्यास पेट्रोल पंपावरील मशिन्समध्ये ती ०१ रुपये इतकीच दिसेल. आणि यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून पेट्रोल विक्रेते आणि ग्राहकांमध्ये वाद होऊ शकतात. त्यामुळे जर पेट्रोल शंभरीपार झाल्यास जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत पेट्रोल पंप ठप्प राहणार आहेत.

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. प्रभाकर रेड्डी यावर म्हणतात, ‘ज्यावेळी डिस्पेंसिंग यूनिट्स डिजिटल बनवले त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते की पेट्रोल-डिझेल १०० रूपयाचा आकडा गाठेल. पेट्रोलियम कंपन्या शेवटच्या क्षणी यामध्ये बदल करण्याचे सांगत आहेत. जर यामध्ये बदल नाही झाला तर याचा फटका डीलर्स आणि ग्राहकांना बसू शकतो. कारण सिस्टिम अपडेट करण्यासाठी वेळ लागतो. असे झाल्यास रिटेल इंडस्ट्री ठप्प होईल.’ पेट्रोलियम इंडस्ट्री यावर लवकरात लवकर यावर तोडगा काढणार का? की पेट्रोल पंप ठप्प होणार?  हे लवकरच समजेल.

भारतातल्या पेट्रोल व डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन तेलाच्या दरांवर अवलंबून असतात. सध्या कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या आसपास आहे. या वर्षाअखेरीपर्यंत हा दर शंभर डॉलर्स पार करू शकतो असा अंदाज सिंगापूरमध्ये एशिया पॅसिफिक पेट्रोलियम कॉन्फरन्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत इराणवरील निर्बंधांमुळे प्रति दिन कच्च्या तेलाच्या 20 लाख बॅरलचा तुटवडा जाणवणार आहे. बाजारात इतकं तेल कमी आलं तर कुठलीही पर्यायी व्यवस्थेच्या अभावी कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकतील असं मर्युरिया एनर्जी ट्रेडिंग या कंपनीचे अध्यक्ष डॅनियल जाग्गी यांनी सांगितले. त्यामुळे वर्षाअखेरीस किंवा 2019च्या सुरूवातीला हा भाव 100 डॉलर्सच्या पार जाऊ शकतो असे जाग्गी यांनी सांगितल्याचे वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 5:43 pm

Web Title: if petrol price hits 100 mark most pumps will display zero
Next Stories
1 राष्ट्रवादी मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही, काँग्रेसचा विरोध
2 VIDEO : पाकिस्तानी हेलिकॉप्टरकडून भारतीय हद्दीचे उल्लंघन, जवानांचे प्रत्युत्तर
3 इंडोनेशियातील बळींचा आकडा ८०० वर
Just Now!
X