राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषण पातळीवर केवळ टीका करण्यात धन्यता मानणाऱ्यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगलीच चपराक दिली आहे. ‘मला शिव्या देऊन प्रदूषण कमी होणार असेल तर रोज सकाळी उठून हाच उद्योग करावा,’ अशा शब्दांत त्यांनी अशा लोकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला . ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

केजरीवाल म्हणाले, ‘ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांतील दिल्लीतील प्रदुषणाच्या पातळीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दिल्लीकर स्वत:च आपले शहर प्रदुषित करीत आहेत. विषारी हवेच्या या प्रदुषणाला वाहतूक, धूळ आणि कंपन्यांचेही प्रदूषण कारणीभूत आहे.’

२८ ऑक्टोबरपासून १२ नोव्हेंबर या काळात पंजाब आणि हरियाणा या राज्यात शेतातील भात पिकाचे अवशेष जाळल्यामुळे दिल्लीत प्रदुषण पसरते. हेच दिल्लीतील प्रदूषण वाढीचे मुख्य कारण असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे दिल्लीतील प्रदुषणावर पंजाब आणि हरिणाया ही दोन राज्येच तोडगा काढू शकतात, असेही ते म्हणाले.

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी १२ विविध प्रकारची मशिने दाखवल्याचे त्यांनी सांगितले. या मशिन्समुळे या समस्येवर तोडगा निघू शकतो. सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या या मशिनच्या खरेदीसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येते. या अनुदानात वाढ करुन ते ८० टक्के दिल्यास आणि या मशिन्स शेतकऱ्यांमध्ये वाटल्यास या प्रदुषणाच्या समस्येवर उपाय शोधता येईल. सरकार शेतकऱ्यांना जोवर तंत्रज्ञानाचे समाधान देत नाही तोवर यावर समाधानकारक तोडगा निघणार नाही, असे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांत दिल्लीतील प्रदुषणाची पातळी धोकादायक स्थितीत होती. तेव्हा दिल्ली सरकारने सम-विषम योजना वापरणार होते. मात्र, यातून महिला आणि दुचाकी वाहनांना सूट देण्यास राष्ट्रीय हरित लावदाने विरोध केल्याने ही योजना लागू करण्यात आली नव्हती.